Fri, Nov 16, 2018 20:17



होमपेज › Nashik › हरभरा श्वास नलिकेत अडकून एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू 

हरभरा श्वास नलिकेत अडकून एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू 

Published On: Feb 16 2018 5:44PM | Last Updated: Feb 16 2018 5:44PM



सिडको : वार्ताहर

हरभरा श्वास नलिकेत अडकल्याने एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्‍याची घटना घडली. सिडको परिसरातील हनुमान चौकात राहणाऱ्या सुजाता बिजुटकर यांच्या  सुजय या एक वर्षाचा मुलाने सकाळी खेळत असताना, फरशीवर पडलेला हरभरा तोंडात घातला. थोड्या वेळाने त्याला त्रास होऊ लागल्याने त्यास शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी उपचार सुरु असताना अखेर सुजयची प्राण ज्‍योत मालवली.

या विषयी अधिक माहिती अशी, सिडको परिसरात राहणाऱ्या सुजाता बिजुटकर यांना एक वर्षाचा सुजय हा मुलगा आहे. तो नेहमी प्रमाने सकाळी उठल्‍यावर खेळत असताना फरशीवर पडलेला हरभरा तोंडात घातला. हे  प्रथम दर्शनी  कोणाच्याही लक्षात आले नाही. मात्र यानंतर सुजयला त्रास होउ लागल्‍याने त्‍याला त्‍याचे आजोबा आणि आईने जवळच्या दवाखान्यात  घेउन गेले. यावेळी डॉक्‍टरांनी देखील त्‍याला काही झाले नसल्‍याने घरी घेऊन जाण्यास सांगीतले.

 पुन्हा साडे आठ वाजण्याच्या सुमारास सुजयला त्रास असह्य होऊ लागल्‍याने तो जोराने रडू लागल्यानंतर त्यास पुन्हा लहान मुलांच्या दवाखान्यात नेण्यात आले, त्याचा एक्स रे देखील काढण्यात आला परंतु त्यातही श्वास नलिकेत हरभरा अडकला असल्याचे आढळून आले नसल्याचे समजते. यानंतर सुजयला खाजगी रुग्णालयातून जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले, परंतु उपचार सुरु असताना अखेर सुजयची प्राण ज्‍योत मालवली. यानंतर सुजयचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या श्वास नलिकेत हरबरा अडकल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला व यातच त्याचा मृत्यू
झाला असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नुकताच १४ फेब्रुवारी २०१८ रोजी सुजयचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला होता. मात्र काळाने त्याच्यावर दोन दिवसातच अशा प्रकारे घाला घातल्‍याने समस्त हनुमान चौकात शोककळा पसरली आहे.