Fri, Apr 19, 2019 12:03होमपेज › Nashik › मनमानीबद्दल सर्वच शाळांची चौकशी 

मनमानीबद्दल सर्वच शाळांची चौकशी 

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 08 2018 11:31PMनाशिक : ज्ञानेश्‍वर वाघ

शाळांमधील मनमानी कारभार आणि शिक्षण हक्‍क कायद्याचे काटेकोर पालन होत नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक मनपा हद्दीतील सर्व मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिले आहेत. यासंदर्भात या कार्यालयाने मनपा शिक्षण मंडळ व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला परिपत्रक काढले असून, पुढील आठवड्यापासून ही चौकशी मोहीम हाती घेतली जाणार आहे. 

नाशिकरोड येथील एमराल्ड हाइटस पब्लिक स्कूल, केम्ब्रिज स्कूल, सेंट फ्रान्सिस यासह शहरातील विविध शाळा शिक्षण शुल्क तसेच विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याच्या कारणावरून वादात सापडल्या आहेत. यासंदर्भात जनआंदोलन आणि त्यानंतर शिक्षण खात्याकडून कारवाई केल्यानंतरही इंग्रजी माध्यमांच्या शाळांसह काही मराठी माध्यमाच्या शिक्षण संस्थांनी आपला कारभार सुधरवलेला नाही. याच पार्श्‍वभूमीवर तीन दिवसांपूर्वीच एमराल्ड शाळेतील प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकार पुन्हा समोर आल्याने त्याची गंभीर दखल शिक्षण उपसंचालक कार्यालयाने घेत मनपा शिक्षण मंडळ व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला परिपत्रक काढत विस्तार अधिकार्‍यांच्यामार्फत शहरातील सर्वच शाळांच्या प्रवेश प्रक्रिया व शैक्षणिक शुल्काच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या आठवड्यात या मोहीमेला सुरुवात होणार असून, एक महिन्यात त्याचा अहवाल शिक्षण उपसंचालकांना सादर करावयाचा आहे. शाळांसंदर्भात तक्रारी समोर आल्याने या चौकशीचे काम शिक्षण विभागाने हाती घेऊन सफाई मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.