नाशिकरोड : प्रतिनिधी
सकल मराठा समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला नाशिकरोड परिसरात हिंसक वळण लागले. संतप्त झालेल्या जमावाने येथील देना बँकेच्या एटीएमसह पाच ते सहा दुकानांची तोडफोड केली आहे. त्याचप्रमाणे परिसरातील रस्स्यावर ठिक ठिकाणी टायर जाळून निषेध नोंदविला आहे. यावेळी सुमारे दोन हजारांच्या आसपास जमाव रस्स्यावर उतरला होता.
मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा समाजबांधव बुधवारी ( दि. २५ ) सकाळी दहा वाजल्यापासुन नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे संघटीत झाले. येथुन सुमारे अकरा वाजण्याच्या दरम्यान मराठा समाज एक मराठा लाख मराठा अश्या घोषणा देत देवी चौकाच्या दिशेने निघाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर।यांच्या पुतळ्या मार्गे सत्कार पॉईंट , मुक्तीधाम , बिटको चौक , दत्त मंदिर चौक मार्गे पुन्हा बिटको चौक ते शिवाजी महाराज पुतळा असा जमाव निघाला. यादरम्यान सर्वत्र दुकाने बंद करण्याचे आवाहन केले जात होते. तसेच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जात होती. एक मराठा लाख मराठा या घोषणेने परिसर दुमदुमला होता. दरम्यान एकीकडे जमाव शांततेत दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत होता तर दुसरीकडे अटलरी सेंटर रोड वर काही समाज कंटक दुकानावर दगडफेक करीत होते. मुक्तीधाम ते बिटको मार्गा वरील प्लाउड, कपड्याच्या दुकानाची जमावाने नासधूस केली. तसेच खान पेट्रोल पंपा समोरील देना बँकेचे एटीएम आणि दोन दुकानाची नासधूस करण्यात आली. त्याच प्रमाणे देवळाली गाव , जेलरोड , सिन्नरफाटा, विहितगाव आदी ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून वाहतूकीला अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.
रास्ता रोकोचा प्रयत्न फसला
सिन्नर फाटा येथे रास्ता रोको करून नाशिक - पुणे महामार्ग रोखण्याचा प्रयत्न जमावाने केला. मात्र पोलीस यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप करून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.