Wed, Jul 24, 2019 06:24होमपेज › Nashik › स्वत:हून अतिक्रमणे काढा; अन्यथा कारवाई

स्वत:हून अतिक्रमणे काढा; अन्यथा कारवाई

Published On: Mar 01 2018 11:03PM | Last Updated: Mar 01 2018 10:53PMनाशिक :

मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत सध्या शहरासह सातपूर, सिडको, पंचवटी व नाशिकरोड भागात अतिक्रमण हटविण्याचा धडाका सुरू आहे. यासंदर्भात आता मनपा आयुक्तांनी जाहीर नोटीस बजावत अतिक्रमण केलेल्या मालमत्ताधारकांनी तत्काळ अतिक्रमण हटवावे. अन्यथा, कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत. आयुक्तांच्या या आदेशामुळे अनेकांच्या उरात धडकी भरली आहे. 

नाशिक महापालिका हद्दीतील नियमित बांधकामाव्यतिरिक्त रस्त्याच्या पुढील बाजूस, चौक, फुटपाथ याठिकाणी असलेले रहदारीस तसेच, पादचार्‍यांस अडथळा ठरणारे अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे तसेच पक्क्या व कच्च्या स्वरुपाचे शेड, टपर्‍या, ओटे हटविण्याचे काम मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत सध्या सुरू आहे. नाशिक मनपा क्षेत्रामध्ये मुख्य व दाट वर्दळीचे रस्ते, चौक, फुटपाथ इ. ठिकाणावरील सर्व प्रकारच्या नियमित बांधकामांव्यतिरिक्त सामासिक अंतरातील अनधिकृत व विनापरवाना बांधकामे व अतिक्रमणे  तसेच शेड, ओटे, टपर्‍या हटविण्याची कारवाई मनपामार्फत हाती घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरातील वर्दळीचे व मनपा विकास योजनेअंतर्गत येणारे 30 मी, 24 मी. 18 मी. 12 मी. 9 मी. 7.5 मी. व 6 मीटर अशा रस्त्यांवरील अथवा रस्त्यास, रहदारीस अडथळा ठरणारे सर्व प्रकारचे अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. यासंदर्भात नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे तत्काळ काढून घ्यावीत, अन्यथा मनपामार्फत कोणत्याही क्षणी पूर्वसूचना न देता संबंधित अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यात येतील.