Mon, Mar 18, 2019 19:33होमपेज › Nashik › नाशिक-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

नाशिक-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सिन्नर: प्रतिनिधी

नाशिक-पुणे महामार्गावर रविवारी अपघातांची मालिका बघण्यास मिळाली. अर्ध्या तासांच्या अंतराने अपघातांची हॅटट्रिक झाल्याने रविवार अपघातांचा दिवस ठरला. सुदैवाने तिन्ही अपघातांमध्ये जीवितहानी टळली. मात्र, चार जण गंभीर जखमी झाले आहे. 

सकाळी आठ वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील दोडी गावाजवळील ब्रह्मानंद पेट्रोलपंपासमोर चार ट्रकचा भीषण अपघातात झाला. सिन्नरहून संगमनेरच्या दिशेने जाणार्‍या ट्रकला (जीजे ०३, एटी ४६५४) समोरून भरधाव येणार्‍या मालट्रकने (एमएच १७, एजी ९९५७) जोरदार धडक दिली. त्यापाठोपाठ येणार्‍या आयशर टेम्पो (इजी ०८, वाय ७३६०) पुढच्या मालट्रकवर धडकला. तर आयशर टेम्पोवर मागून येणारा मालट्रक (एमएच १५, एजी ३४९८) आदळला. या विचित्र अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

चार ट्रकच्या विचित्र अपघातांमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन एकेरी वाहतूक सुरू केल्याने वाहतूक कोंडी फुटली.

दुसरा अपघात सकाळी साडेआठ वाजता नांदूरशिंगोटे शिवारातील हॉटेल गायात्रीजवळ घडला. सिन्नरहून संमनेरच्या दिशेने जाणारा दूध टँकर (एमएच१५, इजी ६२१०) पलटी झाला. टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा माहिती पोलिसांनी दिला. तर तिसरा अपघात नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात झाला. मोल्डींग साहित्य सिन्नरहून नाशिककडे घेऊन जाणारा टेम्पो घाटातील तीव्र उतारावर पलटी झाला. या दोन्ही अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले. 

दोडी अपघात प्रकरणी वावी पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार पी. के. आढांगळे करत आहे.