होमपेज › Nashik › लाचखोर उपनिरीक्षक निवांतचा मुद्दा विधानपरिषदेत 

लाचखोर उपनिरीक्षक निवांतचा मुद्दा विधानपरिषदेत 

Published On: Dec 19 2017 8:21PM | Last Updated: Dec 19 2017 8:21PM

बुकमार्क करा

नाशिक : विशेष प्रतिनिधी 

आर्थिक गुन्हे शाखेतील निलंबित पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधवने तक्रारदार महिलेला अवमानकारक वागणूक दिली होती. त्याबाबत शिवसेना प्रवक्त्या आमदार निलम गोर्‍हे यांनी विधानपरिषदेत प्रश्‍न मांडला .त्यावर राज्य शासनाने याप्रकरणी दोषी असणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

17 नोव्हेंबर 2017 रोजी लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेतील  पोलिस  उपनिरीक्षक  निवांत जाधवला लाच घेतांना रंगेहात पकडले होते. त्यांच्या विरोधात एका महिलेने तिच्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार  नाशिक पोलिस आयुक्तालयात लेखी केली होती. मात्र कोणतीही कारवाई न करता व तिला आणि तिच्या पतीला 12 ऑगस्ट 2016 रोजी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली त्यावेळी तपास अधिकारी म्हणून असलेले एन.जे.जाधव तसेच त्यांचे वरिष्ठ या दोघांनी पैशाची मागणी केल्याचा आरोप सदर महिलेने केला होता.या मागणीनुसार महिला आणि त्यांच्या भावाने दिलेले दोन लाख रुपये अजित पवार नामक व्यक्तीसह जाधव यांनी स्विकारले तर उर्वरित पैशाकरिता सतत मानसिक छळ करण्यात आल्याचे महिलेचे म्हणणे आहे. याबाबतची लेखी तक्रार तत्कालीन पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे आणि विद्यमान पोलीस उपायुक्त विजय मगर यांनी महिलेसमोर फेटाळून लावल्याचाही आरोप या महिलेने केला होता. याबाबत आ.गोर्‍हे यांनी अशा प्रकारच्या घटनांसंदर्भात निगराणी करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच प्रकरणामध्ये उच्चस्तरीय महिला अधिका-यांची नियुक्ती करून वरील प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही आमदार गोर्‍हे यांनी केली आहे.