Mon, Jan 21, 2019 23:21होमपेज › Nashik › पायावर गोळीबार करीत दोन लाखांची लूट 

पायावर गोळीबार करीत दोन लाखांची लूट 

Published On: Dec 31 2017 6:01PM | Last Updated: Dec 31 2017 6:01PM

बुकमार्क करा
पंचवटी वार्ताहर 

मुंबई येथून भाजीपाल्याची वसुली करून घराकडे निघालेल्‍या व्यापाऱ्याच्या डोळयात मिरचीपूड टाकत, पायावर गावठी कट्ट्यातून गोळी मारून चार ते पाच संशयितांनी दोन लाख रुपयांची रोकड पळवून नेली. ही घटना शनिवार (दि.३०) रोजी रात्री उशिरा पेठरोडवरील भक्तिधाम समोर घडली आहे. या घटनेत भाजीपाला व्यापारी महेशकुमार अग्रहरी हे जखमी झाले आहे.

महेशकुमार राधेश्याम अग्रहरी ( वय ३९) रा तुलसीशाम सोसायटी, पेठफाटा असे या मार्केट मधील भाजीपाला व्यापाऱ्याचे नाव आहे. अग्रहरी नेहमीप्रमाणे मुंबई येथील वाशी मार्केट येथे भाजीपाल्याच्या वसुलीसाठी जात असतात .शनिवार दि ३० रोजी देखील ते सकाळी पंचवटी एक्स्प्रेसने मुंबई येथे जाऊन व्यापाऱ्यांकडून २ लाख रुपये वसूल करून संध्याकाळी पुन्हा पंचवटी एक्स्प्रेसने नाशिक गाठले . निमाणी येथे बस मधून उतरून त्यांनी रस्त्याने पायी भक्तिधाम परिसरात असणाऱ्या आपल्या राहत्या घराच्या इमारतीच्या बाहेर आले असता. याठिकाणी दबा धरून बसलेल्या चार ते पाच संशयितांपैकी दोघांनी अग्रहरी याना मारायला सुरुवात केली आणि हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकाने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. तर दुसऱ्याने आपल्या कडील गावठी कट्ट्यातून अग्रहरी यांच्या मांडीवर गोळीबार केला यात अग्रहरी यांच्या पायात गोळी लागल्याने पायातून रक्त वाहायला लागले. अचानक झालेल्या या हल्ल्याने त्यांच्या हातातील दोन लाख रुपयांची बॅग हिसकावण्यात हल्लेखोराना यश आले तसेच फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आलेले हल्लेखोर निळसर कलरच्या मारुती ८०० मधून पसार झाले .पोलिसांनी घटनास्थळावरून गोळीबार करण्यात आलेल्या काडतुसाची रिकामी पुंगळी ताब्यात घेतली आहे .तर अग्रहरी यांच्या पायातून काढलेली गावठी कट्ट्यातील गोळी देखील पोलिसांनी जप्त केली आहे .    

गोळीबार करीत लूटमार झाल्याची घटना समजताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक आनंद वाघ, यांच्यासह पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.