Wed, Jul 24, 2019 15:11होमपेज › Nashik › प्रेयसीवर हल्‍ला करणार्‍यास कारावास

प्रेयसीवर हल्‍ला करणार्‍यास कारावास

Published On: Dec 19 2017 2:04AM | Last Updated: Dec 18 2017 10:55PM

बुकमार्क करा

नाशिक :

जेवण दिले नाही, या कारणावरून प्रेयसीवर चाकूने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍यास प्रियकरास जिल्हा न्यायाधीश सुरेंद्र आर. शर्मा यांनी पाच वर्षे कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. गणेश अरुण सूर्यवंशी (30, रा. गणेशवाडी) असे या आरोपीचे नाव आहे. गणेशचे पंचवटीतील गणेशवाडी परिसरात राहणार्‍या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. 8 जुलै 2014 रोजी रात्री अकराच्या सुमारास तो प्रेयसीच्या घरी गेला व जेवण मागितले. मात्र, तिने जेवण दिले नाही याचा राग आल्याने गणेशने प्रेयसीचे तोंड दाबून चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात तरुणीच्या दोन्ही हाताची बोटे कापली गेली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गणेशविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एल. बी. कारंडे यांनी तपास करून गणेशविरोधात पुरावे गोळा करून न्यायालयात सादर केले. सरकारी पक्षातर्फे एस. एस. कोतवाल यांनी युक्‍तिवाद केला. साक्षीदार आणि सबळ पुराव्यांच्या आधारे गणेशला पाच वर्षे कारावास आणि दंड ठोठावण्यात आला. सुनावणीच्या वेळी आरोपीविरोधात न्यायालयात वेळोवेळी पाठपुरावा केल्याबद्दल  सहायक पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. शिंदे आणि पोलीस नाईक एस. एल. जगताप यांचे पोलीस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी अभिनंदन केले.