Wed, Apr 24, 2019 15:31होमपेज › Nashik › ‘ओखी’मुळे  अवकाळी पाऊस; पिकांना फटका

‘ओखी’मुळे  अवकाळी पाऊस; पिकांना फटका

Published On: Dec 06 2017 1:42AM | Last Updated: Dec 06 2017 12:03AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

तामिळनाडू व केरळमध्ये धुमाकूळ घालणारे ओखी चक्रीवादळ गुजरातकडे सरकले असले, तरी मंगळवारी (दि.5) त्याचा नाशिक जिल्ह्यावरही परिणाम झाला. पहाटेपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे कांदा, द्राक्षे, गहू या पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात दिवसभरात 125 मिमी पावसाची नोंद झाली असून, पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना हुडहुडी भरली आहे. 

जिल्ह्यात ओखी वादळाचा परिणाम दोन दिवसांपासून जाणवत असून, नाशिककर ढगाळ वातावरणाचा अनुभव घेत आहेत. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास नाशिक शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. सिन्नरवगळता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दिवसभर पावसाच्या सरी सुरू होत्या. सुरगाण्याला पावसाने झोडपून काढले असून, या तालुक्यात सर्वाधिक 26 मिमी पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल पेठमध्ये 22.2 मिमी पाऊस झाला.