Mon, Mar 25, 2019 17:41होमपेज › Nashik › नाशिकमध्ये मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतेच!

नाशिकमध्ये मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतेच!

Published On: Apr 17 2018 5:19PM | Last Updated: Apr 17 2018 5:19PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा आकडा वाढत असल्याने मुलींच्या सुरक्षिततेविषयी पालकांमध्ये काळजी वाढली आहे. गेल्या तीन वर्षात 150 हून अधिक अल्पवयीन मुलींना विनयभंग आणि बलात्कारासारख्या अत्याचारांना तोंड द्यावे लागले आहेत. याप्रकरणी संशयित आरोपींना पकडण्यात आले असले तरी बहुतांशी पीडित मुली न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. 

शहरातील शाळा, महाविद्यालये आणि क्लास परिसरासह उद्याने, बाजारपेठांमध्ये अल्पवयीन मुलींना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे गुन्ह्यांवरून सिद्ध झाले आहे. अत्याचार करणार्‍यांपैकी 90 टक्के हून अधिक संशयित पीडित मुलीच्या ओळखीतीलच असल्याने अनोळखी व्यक्तींपेक्षा ओळखीच्या व्यक्तींपासूनच मुली असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. सन 2015 मध्ये 49, सन 2016 मध्ये 47 आणि सन 2017 मध्ये 61 मुलींचे विनयभंग आणि बलात्कार झाल्याची नोंद शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये आहे. त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षात 405 अल्पवयीन मुलींना प्रेमाचे आमीष किंवा इतर गोष्टींची फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी 8 ते 10 टक्के मुली अद्याप बेपत्ता असल्याची नोंद पोलीस ठाण्यांमध्ये आहे. त्यामुळे अपहृत मुलींचा शोध घेण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेसमोर आहे. 

मुली अज्ञान म्हणजेच अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत अनेक संशयित आरोपी मुलींवर दबाव टाकत असतात. त्यातूनच दोघा भावंडांसह त्यांच्या आईने घराजवळ राहणार्‍या 17 वर्षीय मुलीवर लग्न करण्यास दबाव टाकल्याने त्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात जुने नाशिक परिसरात घडली. त्याचप्रमाणे एका पित्याने पोटच्या मुलीस मारून स्वत: आत्महत्या केल्याची घटनाही घडली होती. त्याचप्रमाणे 19 महिन्यांच्या मुलीवर तिच्या काकानेच अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनांमुळे काही मुली घरातही असुरक्षित वातावरणात वावरत असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी लहान मुलींवर झालेले सर्व गुन्हे उघडकीस आणले असून, त्यातील सर्व संशयितांना अटक केली आहे. मात्र पीडितांना अजूनही न्यायाची प्रतिक्षा आहे. 

                
गुन्ह्यांचा प्रकार                                           वर्ष
     
विनयभंग, बलात्कार  49     47    67             2015    2016-2017
अपहरण                  163    136    106