Thu, Jul 18, 2019 10:19होमपेज › Nashik › पैसे नव्हे, पाठ्यपुस्तकेच मिळणार

पैसे नव्हे, पाठ्यपुस्तकेच मिळणार

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 06 2018 12:11AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

सर्व शिक्षा अभियानातून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या मोफत शालेय पाठ्यपुस्तक  योजनेला लाभ हस्तांतरण योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उशिरा का होईना; पण शहाणपण सुचल्याने पैसे नव्हे, तर पुस्तकांचेच वाटप विद्यार्थ्यांना होणार आहे. या निर्णयामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. 

वैयक्तिक लाभाच्या योजनांचे पैसे बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यात समाजकल्याण आणि कृषी विभागाच्या योजनांचा समावेश आहेच. शिवाय मोफत शालेय गणवेश आणि मोफत पाठ्यपुस्तकांचाही समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी गणवेशाचे पैसे खात्यात जमा करण्यात आले. पुस्तकांच्या बाबतीत मात्र निर्णय स्थगित ठेवण्यात आला होता. अर्थात तक्रारी प्राप्त झाल्यानेच तसा निर्णय घेणे भाग पडले होते. गेल्या वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात पुन्हा आदेश येऊन धडकला. पुस्तकांचे पैसे खात्यातच जमा होतील, असे त्यात नमूद करण्यात आले होते. 200 रुपयांची पुस्तके खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना तालुक्याच्या गावी जाऊन पुस्तके खरेदी करावी लागणार होती. खरेदीच्या पावत्या दाखविल्यानंतरच पैसे खात्यात जमा होणार होते. यातील तक्रारींचा ओघ सरकारी पातळीवर ध्यानात आणून दिल्यानंतर मात्र सरकार बॅकफुटवर आले आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेतून पाठ्यपुस्तकांना वगळण्यात यावे, असा प्रस्ताव पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने सरकारला पाठविला होता. त्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली.