Fri, Nov 16, 2018 06:53होमपेज › Nashik › नाना पाटेकर यांची 'राज'कीय टीका

नाना पाटेकर यांची 'राज'कीय टीका

Published On: Feb 06 2018 4:38PM | Last Updated: Feb 06 2018 4:47PMनाशिक : प्रतिनिधी

मनसेप्रमुख राज ठाकरे व अभिनेते नाना पाटेकर यांच्यात फेरीवाल्यांवरून गाजलेला वाद ताजा असताना, पाटेकर यांनी पुन्हा एकदा राजकीय नेत्यांवर निशाणा साधला. अस्तित्व नसलेली मंडळी पुन्हा अस्तित्व निर्माण करण्यासाठी तरूणांमध्ये जाती-धर्माच्या भिंती उभ्या करून स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेत असल्याची टीका त्यांनी केली. आपण कोणाचे नाव घेणार नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले असले, तरी त्यांच्या टीकेचा अप्रत्यक्ष रोख राज ठाकरे यांच्या दिशेनेच असल्याचे बोलले जात आहे. 

‘आपला मानूस’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पाटेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिग्दर्शक सतीश राजवाडे, निखिल साने उपस्‍थित होते. त्यात सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना पाटेकर म्हणाले, सध्याचे वातावरण गलिच्छ असून, आपली राजकीय स्थिती डळमळीत झालेली मंडळी जात-पात, धर्माच्या नावावर फूट पाडून त्याचा फायदा उचलत आहेत. नोकर्‍यांचे व्यस्त प्रमाण, खूप शिकूनही पगाराच्या रूपात हातात पडणारे अवघे 10-12 हजार रुपये यामुळे तरुण पिढीला नैराश्य आले आहे. अशा तरुणांकडून दगडफेक, आगी लावून घेतल्या जातात. ही मुले आठ-दहा वर्षे तुरुंगात गेल्यावर नेते त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. अशा स्वार्थी मंडळींपासून तरूणांनी दक्ष राहायला हवे. त्यासाठी आपण निरनिराळ्या महाविद्यालयांना भेटी देऊन त्यांना सजग करीत आहोत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल मी दहा ठिकाणी चांगला बोलत असेन. एखाद्या क्षणी ते चुकल्याचे वाटल्यास तेदेखील बोलेन. पण, प्रत्येक वेळी चुकांवर बोट ठेवण्याऐवजी समाजानेही आपली जबाबदारी ओळखावी, असेही पाटेकर म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या विधानांबाबत निरनिराळे तर्क लढविले जात असून, त्यांनी पुन्हा एकदा मनसेलाच लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे. 

कॉंग्रेसवरही निशाणा

पाटेकर यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवरही निशाणा साधला. कालपर्यंत सत्ताधारी असलेली मंडळी आज सत्तेत नसताना जनतेबाबत किती सहानुभूती बाळगत आहेत, हे दिसतेच आहे. एवढी सहानुभूती त्यांनी तेव्हाच बाळगली असती, तर बरे झाले असते, असा टोला त्यांनी लगावला. 

राजकारण नको!

सामाजिक प्रश्‍नांवर बोलत असलो, तरी राजकारणात जाण्याची इच्छा नाही. तसे झाल्यास मी माझा बोलण्याचा अधिकार गमावून बसेन.  पक्षप्रमुख चुकल्यास मी त्याला तोंडावर सुनावेन. मग तो मला पक्षातून काढून टाकेल. महिनाभरात सर्व पक्ष फिरून झाल्यावर मी पुन्हा एकटाच उरेल. त्यापेक्षा आहे तसा साधा-सरळच बरा असल्याचे नाना पाटेकर म्हणाले. 

प्रमोशन करीत नाही, प्रश्‍न मांडतो!

तुम्ही प्रमोशन करणार नव्हतात, मग आता गावोगाव का फिरत आहात, या प्रश्‍नावर पाटेकर यांनी आपण चित्रपट प्रमोशनच्या उद्देशाने आलेलो नसल्याचे सांगितले. रसिकांचा आपल्यावर विश्‍वास आहे. पण, यानिमित्ताने सध्याच्या सामाजिक, राजकीय प्रश्‍नांवर बोलता येते म्हणून आपण गावोगावी जात असल्याचे ते म्हणाले.