Mon, Jun 24, 2019 21:21होमपेज › Nashik › नाशिक : नागरे हत्या प्रकरण; न्यायालयाच्या आवारातच शिजला हत्येचा कट

नाशिक : नागरे हत्या प्रकरण; न्यायालयाच्या आवारातच शिजला हत्येचा कट

Published On: Jul 22 2018 5:53PM | Last Updated: Jul 22 2018 5:53PM
पंचवटी : देवानंद बैरागी 

पंचवटी परिसरात मंगळवार (दि.१०) रात्री रामवाडीतील आदर्शनगर येथे राहणाऱ्या किशोर रमेश नागरे (२६) याची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली होती .या हत्येप्रकरणी पंचवटी पोलिसांनी एका विधी संघर्षित बालकासह दोघा फरार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर झालेल्या तपासात कारागृहामध्ये खुनाच्या गुन्ह्यात बंद असलेल्या सराईत आरोपीच्या सांगण्यावरून ही हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. या हत्याप्रकरणातील आरोपींची संख्या चारवर पोहचली आहे. विशेष म्हणजे हत्या करायचा डाव हा न्यायालयाच्या आवारात शिजला असल्याचे पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाला घाबरण्याऐवजी त्याचठिकाणी हत्याकांडाचा डाव शिजविण्यात येत असल्याने पोलिस प्रशासनाच्या इभ्रतीचे चांगलेच धिंडवडे निघाले आहेत. 

रामवाडी येथील आदर्शनगर येथे राहणाऱ्या किशोर नागरे याचा खून एका दुचाकीवरून आलेल्या शुभम निवृत्ती पांढरे, अविनाश उर्फ वामन्या रावसाहेब वाणी आणि एका विधिसंघर्षित संशयित आरोपीने केल्याचे उघड झाले होते. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी या तिघा संशयितांना गजाआड केले होते. हत्येचे कारण पूर्ववैमनस्यातून झाल्याचे संशयितांनी सांगितल. मात्र, गेल्या काही वर्षांपूर्वी ठक्कर बाजार शेजारील तुळजा बार येथे व्यंकटेश मोरे व त्याच्या गुन्हेगार टोळक्याने गुणाजी जाधव याचा खून केला होता. या खुनातील मुख्य साक्षीदार नागरे असल्याने हत्येच्या रात्रीपासूनच ही हत्या त्याच खुनाच्या घटनेमुळे केल्याचा संशय अनेकांनी वर्तविला होता. याबाबत पंचवटी पोलिसांनी केलेल्या चौकशी नंतर एक भयाण वास्तव पुढे आले आहे . 

सध्या खुनाच्या आरोपाखाली कारागृहात असलेला संशयित आरोपी व्यंकटेश मोरे हा न्यायालयात दर महिन्याला तारखेसाठी येत असतो. किशोर नागरे हत्या प्रकरणात विधी संघर्षित असलेला संशयित आरोपी याची आणि व्यंकटेश मोरेंची चांगली मैत्री असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मोरे हा न्यायालयात तारखेसाठी आला असता त्याला आपण भेटून किशोर नागरेची हत्या करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर मोरे याने देखील नागरेला मारून टाकण्यासाठी आपला होकार दिल्याचे कबुली जबाबात सांगितले आहे. त्यामुळे पंचवटी पोलिसांनी नागरे हत्या प्रकरणात व्यंकटेश मोरेला कट रचला म्हणून आरोपी केले आहे . 

मुख्य साक्षीदार नागरे याची हत्या केल्याने मोरे गँगला गुणाजी जाधव याच्या हत्या प्रकरणात क्लिनचिट मिळून सर्व आरोपी निर्दोष सुटू शकतात. एका खुनाच्या गुन्ह्यातून जरी सुटले तरी आता खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य साक्षीदाराला मारले म्हणून कडक कारवाई न्यायालय करू शकते. तसेच त्यांना जामीन मिळणे देखील यापुढे शक्य होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे . 

जिल्हा न्यायालयात दररोज कारागृहातून अनेक कुख्यात गुन्हेगारांना तारखेसाठी न्यायालयात आणले जाते . यावेळी या आरोपींचे अनेक हस्तक पहिल्यापासूनच न्यायालयाच्या आवारात त्यांची वाट पाहत उभे असतात. यावेळी आरोपींसोबत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना काही चिरीमिरी दिल्यास तासंतास या गुन्हेगारांशी त्यांच्या हस्तकांना बोलण्यासाठी मुक्त सोडले जाते. याचाच फायदा घेत हे कुख्यात आरोपी आपल्या विरोधी गटाचा काटा कसा काढायचा याच्या टीप देऊन हस्तकांकडून अशा प्रकारचे हत्याकांड घडवून आणत असल्याचे वास्तव या हत्या प्रकरणातून पुढे आले आहे. पोलिसांनी अनेकदा न्यायालयाच्या आवारात आणलेल्या गुन्हेगारांना नातेवाईकांना आणि हस्तकांना भेटू दिले नाही म्हणून पोलिसांना देखील मारहाण करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याचे नाशिकच्या जनतेने पाहिले आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी न्यायालयात येणाऱ्या आरोपींना कोणालाही भेटू देऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. . 

कारागृहातील संशयित आरोपींचे नेटवर्क वाखाणण्याजोगे म्हणायला हवे. त्यांचा ताबा एखाद्या गुन्ह्यात पोलिसांनी घेतल्यास आरोपी पोलिस ठाण्यात पोहोचण्याच्या अगोदरच त्याचे नातेवाईक आणि हस्तक ठाण्यात त्याचे स्वागत करण्यासाठी आपली हजेरी लावतात. हे विशेष. त्यांच्या पर्यंत ही माहिती पोलिस कर्मचाऱ्यांच्याच मदतीने पोहचविली जाते. हे वेगळे सांगायला नको. यातून गुन्हेगार आणि पोलिसांची असलेली अभद्र छुपी युती समोर येत आहे. याला देखील पायबंद घालणे गरजेचे आहे .