होमपेज › Nashik › मुस्लिम महिला शरीयतच्या बाजूने; मालेगावात मोर्चा (Video)

मुस्लिम महिला शरीयतच्या बाजूने; मालेगावात मोर्चा (Video)

Published On: Feb 15 2018 4:42PM | Last Updated: Feb 15 2018 4:55PMमालेगाव : प्रतिनिधी

तिहेरी तलाक विधेयक घटनाविरोधी असल्याचा आरोप करत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत, मालेगावातील हजारो मुस्लिम महिलांनी गुरुवारी (दि.15) काढण्यात आलेल्या मूकमोर्चात सहभाग नोंदवला. 

‘इस्लामी शरियत हमारा सन्मान है’, ‘हम कानूने शरियत के बाध्य है’ असे फलक झळकवत देशातील दुसर्‍या क्रमांकावरील समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर करत हे विधेयक अन् त्याआधारे राष्ट्रपतींनी केलेले वक्तव्य मागे घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तिहेरी तलाक विधेयकाला प्रखर विरोध दर्शविला आहे. त्यासाठी या मूकमोर्चाचे नियोजन केले होते. शहराच्या विविध भागातून मुस्लिम महिला किदवाई रोडजवळील एटीटी हायस्कूलच्या मैदानावर एकत्र आल्या. तर मुस्लिम तरुणांनी मानवी साखळी करत गर्दीचे नियोजन केले. जुन्या बसस्थानकापासून शिवाजी पुतळा, मोसमपूल मार्गे कॅम्प रोडने मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

आमदार आसिफ शेख, माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माइल यांच्या सूचनेवरून जुन्या तहसीलसमोरील रस्त्यावर महिलांनी ठाण मांडले.  यानंतर महापौर शेख रशीद यांच्या पत्नी तथा माजी महापौर ताहेरा शेख, नगरसेविका शानेहिंद अन्सारी, जमियत उलमाच्या रफियाबिंत अब्दुल खालिक, आयेशा अब्दुल कादीर उस्मानी, जमात ए इस्लामीच्या शबाना शेख मुख्तार, शिया इन्सा अशराच्या नाजिम हुसैन, एमआयएमच्या अनिका फरिन अब्दुल मलिन, बुनकर बिदारी महाजच्या शाकेरा हाजी मो. युसूफ आदी महिला प्रतिनिधींनी ताहफुज ए शरियत कमिटीच्या पत्रकावर प्रांताधिकारी अजय मोरे यांना निवेदन दिले. विविध मुस्लिम संघटनांच्या शिष्टमंडळानेही  निवेदन दिले. 

याप्रसंगी माजी महापौर अब्दुल मालिक, एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेज, स्थायी समितीचे सभापती सलीम अन्वर, जनता दलाचे बुलंद एकबाल, मुश्तकिम डिग्निटी, काँग्रेसचे नगरसेवक असलम अन्सारी, अतिक कमाल आदी उपस्थित होते.

एक को शिक्षा दुसरे को पंतप्रधान बनाऐंगे क्या?

मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्याठिकाणी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव उमरैन महफूज रहमानी यांनी घणाघाती भाषण केले. काही महिलांना पुढे करून सरकारने तीन तलाक विधेयक आणून त्याचा गवगवा केला. परंतु, देशातील लाखो मुस्लिम महिला या शरियत कायद्याच्या पक्षात असल्याचे  मोर्चाने अधोरेखित केले आहे. इस्लाममध्ये महिलांना योग्य सन्मानाची वागणूक दिली जाते, म्हणूनच त्या ‘शरियत’मधील हस्तक्षेपाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. लोकशाहीत जनमताला महत्त्व असल्याने या मूकमोर्चाची दखल घेऊन राष्ट्रपतींनी ‘तिहेरी तलाक’च्या मुद्द्यावरून केलेले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी केली.

एका अहवालाचा दाखला देत त्यांनी, देशातील 23 लाख महिलांना त्यांच्या पतीने सोडले आहे. त्यातील 22 लाख पीडित महिला या हिंदूधर्मीय आहेत अशा परिस्थितीत मुस्लिमाने तलाक दिल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि दुसर्‍याने बायकोला सोडले म्हणून त्याला पंतप्रधान बनवायचे का? असा तिरकस सवाल करताच एकच हशा पिकला. मुसलमान हा धर्म आणि देशाशी इमान राखून असल्याने त्यांच्या धार्मिक भावनांशी खेळू नये, असे आवाहनही त्यांनी केले. 

विविध संघटनांकडून सेवाकार्य 

महिलांचा मोर्चा असल्याने विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था, संघटनांनी मोर्चा मार्गावर सोयी-सुविधांची व्यवस्था केली होती. उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन ठिकठिकाणी थंड पाणी वाटप सुरू होते. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून वैद्यकीय पथक सज्ज होते.