होमपेज › Nashik › एक रुपया दराने मिळकतींचा ताबा : मनपाचा निर्णय

एक रुपया दराने मिळकतींचा ताबा : मनपाचा निर्णय

Published On: Sep 06 2018 10:47PM | Last Updated: Sep 06 2018 10:42PMनाशिक : प्रतिनिधी

मालमत्ताकर थकबाकी असलेल्या 120 मिळकती लिलाव प्रक्रियेत अल्पदरात ताब्यात घेण्यास स्थायी समिती सभेने मंजुरी दिली आहे. संबंधित मिळकतधारकांकडे चार कोटी 13 लाख रुपयांची थकबाकी आहे. 

कर थकबाकी असलेल्या 120 मिळकतींबाबत यापूर्वी महापालिकेने तीन वेळा लिलाव प्रक्रिया राबविली होती. परंतु, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने आता मनपाच या मिळकती एक रुपया इतक्या अल्पदरात ताब्यात घेण्याची कार्यवाही करणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समिती सभेत सादर करण्यात आला होता. त्यास सभापती हिमगौरी आडके आहेर यांनी मान्यता दिली. संबंधित मिळकतधारकांना पुरेशी मुदत द्यावी, अशी सूचना सभेत सदस्य उद्धव निमसे यांनी केली. त्यावर सभापतींनी कर विभागाला विचारणा केली असता उपायुक्‍त डोईफोडे यांनी संबंधित मिळकतधारकांना एकूण दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. असे असताना त्यांच्याकडून थकबाकी भरली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर सभापतींनी प्रस्ताव मंजूर केला. यापुढे आता थकबाकी न भरणार्‍या मालमत्ता जप्‍त करून त्यांची लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे. यापूर्वी मूल्य निर्धारण आणि कर संकलन विभागामार्फत थकबाकीदारांना केवळ कारणे दाखवा नोटिसा बजावून वेळ मारून नेली जात होती. परंतु, आता नोटीस, जप्ती मोहीम आणि त्यानंतर लिलाव अशा स्वरूपाची प्रक्रिया प्रथमच राबविली जात आहे.