Tue, Apr 23, 2019 13:46होमपेज › Nashik › येत्या महासभेवर मनपा बससेवेचा प्रस्ताव

येत्या महासभेवर मनपा बससेवेचा प्रस्ताव

Published On: Sep 05 2018 2:13AM | Last Updated: Sep 05 2018 2:13AMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेमार्फत शहर बससेवा चालविण्याबाबतचा प्रस्ताव येत्या महासभेवर सादर करण्याची तयारी प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. बससेवा चालविण्याकरता विविध बाबींचा समावेश या प्रस्तावात करण्यात आलेला आहे. खासगी तत्वावर देण्यात येणार्‍या या बससेवेत सुरूवातीला 400 बसेस धावतील. प्रशासन सादर करणार्‍या या प्रस्तावाबाबत सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्ष काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे कारण यापूर्वी अनेकदा महासभेने बससेवेला विरोध केला आहे. परंतु, आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकल्पात लक्ष घातलेले असल्याने सत्ताधारी या प्रकल्पासाठी ताकद लावतील. 

मनपामार्फत बससेवा सुरू करण्याविषयी फिजीबिलीटी स्टडी करण्यासाठी सल्लागाराची नियुक्‍ती करण्यास 20 जुलै 2017 मध्ये महासभेने मंजुरी दिली होती. त्यानुसार निविदा काढून या कामाकरता मे. क्रिसील रिस्क अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर सोल्युशन लि. या सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. तथापी, क्रिसीलने बससेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सादर केलेला अहवाल पुरेसा नसल्याने स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सल्लागार मे. के. पी. एम. जी यांनी अहवालावर कामकाज करून अहवाल प्रशासनाला सादर केला. त्यानुसार अनेक बाबींचा सविस्तर अहवाल तयार करून तो प्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी सादर करण्यात येत आहे. नाशिक शहराची लोकसंख्या आजमितीस 18 लाखाहून अधिक आहे. वाढत्या लोकसंख्येच्या वाहतूक साधनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच खासगी वाहनांचा वापर कमी करण्यासाठी शहराकरता सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज निर्माण झाली असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने मनपाने युएमटीसी या सल्लागार संस्थेकडून दोन वर्षांपूर्वी सीटीटीपी तयार करून घेतला. त्यानुसार नाशिकमधील सार्वजनिक वाहतुकीसाठी शहर बससेवा हा सर्वाधिक उत्तम पर्याय असल्याचे म्हटले आहे. 

शहर बस वाहतूक मनपाने न चालविण्याचा निर्णय महासभेने यापूर्वी घेतला होता. तसेच मनपा क्षेत्रातील शहर बससेवा राज्य परिवहन महामंडळामार्फतच चालू ठेवण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबतही मंजुरी देण्यात आलेली होती. त्यानुसार नाशिक महामंडळाला कळविले. महामंडळाने बससंख्या 250 वरून 125 पर्यंत कमी केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे महापालिकेने स्वत:ची बससेवा सुरू करण्याचे प्रस्तावीत केले होते.