Thu, Jun 27, 2019 03:47होमपेज › Nashik › मनपा नगररचना विभागात येण्यास बिल्डरांवर बंधन

मनपा नगररचना विभागात येण्यास बिल्डरांवर बंधन

Published On: Mar 10 2018 2:07AM | Last Updated: Mar 10 2018 12:05AMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेत नेहमीच चर्चेचा आणि गर्दीचा विभाग असलेल्या नगररचना विभागातील कामकाज पारदर्शकपणे होण्याच्या दृष्टीने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार बांधकाम  व्यावसायिक आणि वास्तुविशारदांनी नगररचना विभागात न येता ऑनलाइन पद्धतीनेच त्यांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या असून, अधिकार्‍यांनाही तसे आदेश दिले आहे.

यामुळे आता या विभागात येणार्‍या व्यावसायिक तसेच, या क्षेत्रातील दलालांना बाहेरचा रस्ता दाखविल्याच चित्र महापालिकेत दिसून येत आहे. नगररचना विभागातील कामकाज पारदर्शक आणि त्यात मानवी हस्तक्षेप अधिक नको, या उद्देशाने तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी ऑटो डीसीआर ही प्रणाली सुरू केली. त्यानुसार बिल्डर व आर्किटेक्ट विविध प्रकारचे दाखले, परवानगी  ळविण्यासाठी थेट ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव सादर करू शकतील, हा त्यामागचा उद्देश होता. परंतु, ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने तसेच ऑनलाइन प्रस्ताव सादर केल्यानंतरही नगररचना विभाग ऑफलाइन पद्धतीने प्रस्ताव सादर करण्यास सांगत असल्याने बिल्डर तसेच आर्किटेक्ट्सनी या यंत्रणेविषयी अनेक तक्रारी केल्या होत्या. ऑटो डीसीआर प्रणालीतील त्रुटी महिन्याभरापूर्वी दूर केल्याने आता ही प्रणाली
सुरू असली तरी नगरचना विभागातीलच काही अभियंत्यांना ही प्रणाली नको झाली आहे. कारण सर्वच कामे ऑनलाइन होत असल्याने टेबलाखालून कामे करण्याचा प्रकारच जवळपास बंद झाला आहे. यामुळे बिल्डर व आर्किटेक्ट तसेच, या क्षेत्रातील काही दलाल यांच्याशी संगनमत करून आर्थिक लागेबांधे निर्माण झालेल्यांची नाकेबंदीच प्रशासनाकडून करण्यात आली आहे. परंतु, इतकी बंधने आणूनही नगररचना विभागातील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नसल्याने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या विभागातील अधिकार्‍यांनाच तंबी दिली आहे. बिल्डर, आर्किटेक्ट यांची कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाही. तसेच, त्यांना वारंवार नगररचना विभागाच्या खेटा माराव्या लागू नये यासाठी दक्षता घेण्याची सूचनाही आयुक्तांनी केली आहे. यामुळे आता नगररचना विभागात बिल्डर
वा आर्किटेक्ट कुणी आले तरी संबंधित अभियंते त्यांना नगररचना विभागात जास्त वेळ थांबू नका किंवा येऊच नका, असे सांगून स्वत:वरील बालंट टाळण्याचा प्रयत्न करत आहे. नगररचना विभागात येण्याबाबत बंधने घातली असली तरी त्यामागचा हेतू मानवी हस्तक्षेप टाळण्याचाच असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.