होमपेज › Nashik › नाशिक : उघड्यावर कचरा टाकणार्‍यांना मुंढेंची तंबी

नाशिक : उघड्यावर कचरा टाकणार्‍यांना मुंढेंची तंबी

Published On: May 12 2018 2:39PM | Last Updated: May 12 2018 2:39PMनाशिकरोड वार्ताहर

उघडे नाले, गटारी आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या दुकानदार, नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्याचप्रमाणे संबंधित दुकानदाराना तंबी देऊन तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. 

शनिवारी ( दि.१२ ) सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान आयुक्त मुंढे यांनी नाशिकरोड भागातील जयभवानी रोड, सुभाष रोड येथील उघडे नाले, गटारी तसेच सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी केली. मुंढे यांच्या सरप्राईज दौऱ्यामुळे स्वच्छता, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. जयभवानी रोडवर असणाऱ्या उघड्या नाल्याची अवस्था पाहून मुंढे प्रचंड संतापले. नाल्यात काही स्थानिक नागरिक , दुकानदार, व्यापारी कचरा टाकत असल्याचे मुंढे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संबधित व्यापाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले, शिवाय दंडात्मक कारवाई करावी, असे अधिकाऱ्यांना सुनावले. 

जयभावानी येथील नाल्याची पाहणी केल्यानंतर मुंढे यांनी सुभाष रोड नाल्याची पाहणी केली. येथील नाल्याच्या दुर्गंधीस कारणीभूत असणाऱ्या बेशिस्त दुकानदारांची मुंढे यांनी कानउघाडणी केली. त्यांच्यावर देखील कारवाई करावी, अशी सूचना मुंढे यांनी केली. दरम्यान, आजवरच्या मनपा आयुक्तांच्या दौऱ्यात आयुक्त पाहणी करीत असताना प्रभागातील नगरसेवकांचा समावेश असायचा. आयुक्त आणि नगरसेवक असा संयुक्त दौरा नाशिकरोड प्रभागातील नागरिकांनी अनुभवला आहे. मात्र, शनिवारच्या दौऱ्यात संबंधित नगरसेवक उपस्थित नसल्याने आयुक्तांचा छोटेखानी दौरा चर्चेत राहिला. 

पालकमंत्र्यांना फोन लावा

आयुक्त मुंढे आपल्या  लवाजम्यासह सुभाष रोड येथील नाल्याची पाहणी करीत होते. त्यावेळी एक तळीराम आयुक्तांना उद्देशून म्हटला की, येथे काय चालले आहे. पालकमंत्री माझे नातेवाईक आहेत, त्यांना फोन लावा. यावर आयुक्त मुंढे यांनी तळीरामाची देहबोली ओळखत त्याला बाजूला करा, असे सांगून दुर्लक्ष केले.

Tags : nashik, tukaram mundhe, waste, commissioner