Wed, Mar 27, 2019 04:04होमपेज › Nashik › मनपाचे अंदाजपत्रक स्थायी समितीवरच होणार सादर

मनपाचे अंदाजपत्रक स्थायी समितीवरच होणार सादर

Published On: Mar 21 2018 1:40AM | Last Updated: Mar 21 2018 1:40AMनाशिक : प्रतिनिधी

प्रशासनाने महासभेत सादर केलेले मनपाचे अंदाजपत्रक फेटाळून लावत महापौर रंजना भानसी यांनी स्थायी समितीकडेच अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश आयुक्‍त तुकाराम मुंढे यांना मंगळवारी (दि.20) झालेल्या महासभेत दिले. सत्तारूढ पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी करत आयुक्‍तांना पाठिंबा दर्शविला. दरम्यान,  अंदाजपत्रकाबाबत आयुक्‍त काय भूमिका घेतात असा पेच निर्माण झालेला असताना सायंकाळी महासभेनंतर आयुक्‍तांनी सामंजस्याची भूमिका घेत अंदाजपत्रक सादर करण्यासाठी येत्या 22 मार्च रोजी सभा घेण्याचे पत्र स्थायी समितीचे सभापती हिमगौरी आडके यांना सादर केले. यामुळे अंदाजपत्रकाविषयीचा तिढा सुटला आहे. 

गेल्या 28 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत स्थायी समिती गठीत नसल्याने आयुक्‍तांनी मनपा अधिनियमातील कलम 35 अ नुसार महासभेकडे अंदाजपत्रक सादर करण्याचा प्रस्ताव सादर केला. परंतु, नेमके याच कालावधीत स्थायी समितीही गठीत झाली. यामुळे कलम ‘35 अ’ बाबत पेच निर्माण झाला होता. आयुक्‍तांनी प्रस्ताव माघारी घेतला नाही तर दुसरीकडे सादर केलेला प्रस्ताव महासभेनेही विषयपत्रिकेवर घेतल्याने एकूणच अंदाजपत्रकाविषयी गोंधळ निर्माण झाला होता. तसेच, स्थायी समितीचे अधिकार डावलले जात असल्याने सत्तारूढ भाजपा अंदाजपत्रक स्वीकारणार का असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. मंगळवारी (दि.20) झालेल्या महासभेत गटनेते संभाजी मोरूस्कर यांनी आयुक्‍तांच्या अंदाजपत्रक व स्थायी समितीसंदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराचे वाचन करत 7 मार्च रोजी आयुक्‍तांनी स्थायी समिती अस्तित्वात असल्याचे व नसल्याबाबतचे दोन्ही पत्र विसंगती निर्माण करत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच, संबंधित तारखेपर्यंत स्थायी समिती अस्तित्वात असल्याबाबत नगरसचिवांनी निदर्शनास आणून द्यायला हवे तसेच, मनपाने पत्र माघारी घ्यायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. 24 तासात पत्र देऊन आयुक्‍त त्यांच्या अधिकारात स्थायीची सभा बोलावू शकत होते, असे सांगत आयुक्‍त काटेकोरपणे काम करणारे असल्याने त्यांनी कायद्याचे उल्लंघन करू नये, अशी सूचना मोरूस्कर यांनी केली. कायद्याचा कीस न पाडता अंदाजपत्रक स्थायी समितीवर सादर करण्याची सूचना माजी सभापती शिवाजी गांगुर्डे तसेच, दिनकर आढाव यांनी केली. नगरसचिवांनी संभ्रम केला असून, निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागी अन्य सदस्य नियुक्‍त झाले होते. त्याचवेळी हंगामी सभापती नेमून अंदाजपत्रक स्थायीवर सादर करता आले असते. स्थायीवरील सदस्य महासभेतही असल्याने आता अंदाजपत्रक महासभेत सादर करावे, अशी मागणी सुधाकर बडगुजर यांनी करत आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे आयुक्‍तांकडे पाहत म्हटले. 28 फेब्रुवारीला आठ सदस्यांची नियुक्‍ती झाली होती. मग ठराव सादर करण्यासाठी 7 मार्चपर्यंत विलंब का व कुणामुळे झाला असा प्रश्‍न गुरूमित बग्गा यांनी उपस्थित करत 31 मार्चपर्यंत अंदाजपत्रक मंजूर झाले नाही तर कलम 100 अ नुसार आयुक्‍तांचे अंदाजपत्रक आपोआप मंजूर होते, ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. स्थायी समिती आता अस्तित्वात आल्याने कलम 35 अ रद्द झाले असून, विरोधक त्याचे भांडवल करत आहे. यामुळे महापौरांनी त्यांच्या अधिकारात अंदाजपत्रक स्थायीकडे सादर करण्याचा निर्णय घ्यावा, अशी सूचना अजिंक्य साने यांनी केली.