Thu, Feb 21, 2019 23:22होमपेज › Nashik › शहरात डॉक्टरांचे आंदोलन

शहरात डॉक्टरांचे आंदोलन

Published On: Jan 03 2018 1:15AM | Last Updated: Jan 02 2018 11:39PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी 

लोकसभेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक ठेवण्यात आल्याने त्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेतर्फे शालिमार येथील संघटनेच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी (दि.2) आंदोलन करून काळा दिन पाळण्यात आला. तसेच, शहरातील विविध रुग्णालयातील ओपीडी बंद ठेवण्यात आले होते.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक डॉक्टरांवर अन्याय करीत असल्याचा आरोप आयएमएकडून करण्यात आला आहे. विधेयक पारीत झाल्यास खासगी महाविद्यालये सुरू करण्यासाठी लागणारे सर्व नियम रद्द होतील. कुठलेही महाविद्यालय मनमानीप्रमाणे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढवू शकेल. फक्त 40 टक्के विद्यार्थ्यांच्या फीचे नियमन सरकार करणार असल्याने उर्वरित विद्यार्थ्यांकडून मनमानी पद्धतीने पैसे वसूल केले जाऊ शकतात. नियम न पाळणार्‍या महाविद्यालयांना पाच ते शंभर कोटी दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या राज्य वैद्यकीय परिषदेची स्वायत्ता संपुष्टात येईल.विद्यापीठांना कुठलेही प्रतिनिधित्व नसेल. आधुनिक वैद्यशास्त्राशिवाय इतर शिक्षण घेतलेल्या लोकांना नोंदणीकृत डॉक्टर होता येईल.

विदेशात पदवी घेतलेल्यांना कोणत्याही परीक्षेविना भारतात वैद्यकीय व्यवसाय करता येईल. या सर्व बाबींमुळे या विधेयकाला डॉक्टरांचा विरोध आहे. हे विधेयक श्रीमंत व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना धार्जिणे असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. हे विधेयक संमत झाल्यास वैद्यकीय शिक्षणाचा खर्च प्रचंड वाढेल. तसेच, परदेशातील डॉक्टरांना सेवेसाठी भारताचे दरवाजे उघडे होतील, अशी भीती संघटनेने व्यक्त केली. त्याच्या निषेधार्थ संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलन केले. यावेळी संघटनेचे नाशिक शाखा अध्यक्ष डॉ.मंगेश थेटे, माजी राज्य उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र कुलकर्णी, डॉ.हेमंत सोनानीस, डॉ.राजश्री पाटील आदींसह डॉक्टर उपस्थित होते.