Fri, May 29, 2020 00:56होमपेज › Nashik › माता एचआयव्हीग्रस्त तरी नवजात बालक निरोगी

माता एचआयव्हीग्रस्त तरी नवजात बालक निरोगी

Published On: Nov 30 2017 11:30PM | Last Updated: Nov 30 2017 11:23PM

बुकमार्क करा

नाशिक : गौरव अहिरे

एचआयव्हीग्रस्त झाल्याने अनेक महिलांना मातृत्वाचा आनंद घेण्यास भीती वाटते. मात्र, शासनाच्या जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अ‍ॅण्टी रिट्रोव्हायरल ट्रीटमेंट (एआरटी) केंद्रामार्फत सुरू करण्यात आलेल्या उपचारपद्धतीमुळे अनेक एचआयव्हीग्रस्त मातांना मातृसुख मिळत आहे. विशेष म्हणजे या उपचार पद्धतीमुळे यावर्षी 55 मुलांचा वैद्यकीय अहवाल निरोगी आल्याने मातांना विशेष आनंद मिळत आहे. ‘ट्रीट ऑल’ या संकल्पनेमुळे उपचार सुरू होत असल्याने प्रत्येक घटकातील रुग्णांना याचा फायदा होत असून, त्यांच्या वयोमर्यादेतही वाढ होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.
एचआयव्हीचा प्रसार रोखण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी ‘ट्रीट ऑल’ या संकल्पनेतून एचआयव्हीग्रस्त रुग्णांवर उपचार केले जात आहेत. इतरांना एचआयव्हीची लागण होऊ नये, यासाठी शासनाने एआरटी केंद्र उभारले असून वेगवेगळे शिबिरे, उपक्रम राबवले जातात. त्यामुळे जनजागृती करून एचआयव्हीबाधीत रुग्णांना समुपदेशन आणि योग्य उपचार पद्धतीमुळे त्यांच्यातील एचआयव्हीचे गांभीर्य कमी करण्यासोबतच नव्या रुग्णांना याची बाधा होऊ नये, यासाठी एआरटी केंद्र प्रयत्नशील आहे. या केंद्रामार्फत पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या स्तरावरील रुग्ण आल्यानंतर त्याच्यावर तातडीने आवश्यक ते औषधोपचार केले जात आहे. त्यामुळे एचआयव्हीग्रस्त महिलांनाही याचा फायदा होत असल्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहे. माता एचआयव्ही बाधित असतानाही त्यांची 55 अपत्ये निरोगी जन्मास आल्याचे वर्षभरात दिसून आले आहे. यामुळे शासनाच्या एचआयव्हीच्या प्रसार रोखण्याच्या कार्यक्रमास यश येत आहे.