Thu, Jul 18, 2019 10:16होमपेज › Nashik › नाशिकः नरबळी प्रकरणी ११ जणांना जन्मठेप 

नाशिकः नरबळी प्रकरणी ११ जणांना जन्मठेप 

Published On: Dec 06 2017 1:42AM | Last Updated: Dec 06 2017 1:42AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

चेटकीण असल्याचे सांगून बुगीबाई पुनाजी दोरे (रा. टाके हर्ष, ता. इगतपुरी) आणि काशीबाई भिका वीर (रा. मोखाडा) या दोघा सख्ख्या बहिणींना लाकडी दांडे, इतर हत्यारांनी बेदम मारहाण करून जिवे मारून नरबळी दिल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने अकरा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्‍वर यांनी ही शिक्षा दिली असून, आरोपींमध्ये मृत महिलेच्या दोन मुलांचाही समावेश आहे. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये राज्यातील ही पहिलीच शिक्षा आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये ही घटना घडली होती.

इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष येथे ऑक्टोबर 2014 ला रात्रीच्या सुमारास आरोपी बच्चीबाई खडके आणि बुगीबाई वीर यांनी त्यांच्या अंगात देवी येत असल्याचे सांगून बुगीबाई दोरे, काशीबाई वीर आणि राहिबाई हिरामण पिंगळे (रा. मोखाडा) या तिघी चेटकीण असल्याचे इतर आरोपींना सांगितले. या तिघींमुळे सनीबाई निरगुडे हिला मूलबाळ होत नसल्याने खडके आणि वीर यांनी चेटकीण बाहेर काढण्याच्या नावाखाली बेदम मारहाण केली. त्यामुळे स्वत:च्या आईलाही दोघा आरोपींनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत बुगीबाई व काशीबाईचा मृत्यू झाला. तर राहिबाईने स्वत:चा जीव वाचवत तेथून पळ काढला. भगवान मधे यांनी राहिबाईला फिर्याद देण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे  गुन्हा दाखल करण्यात आला होता. एस. देवराज यांनी या गुन्ह्याचा तपास सरकारी वकील पौर्णिमा नाईक यांनी 27 साक्षीदार तपासले, तर अंतिम युक्तिवाद हा अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांनी केला.