Thu, Dec 12, 2019 08:21होमपेज › Nashik › ‘युनेस्को’च्या हेरिटेज यादीत कुंभमेळ्याचा समावेश  

‘युनेस्को’च्या हेरिटेज यादीत कुंभमेळ्याचा समावेश  

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 07 2017 11:42PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

कुंभमेळा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक यादीत समाविष्ट होताना चीनच्या सांस्कृतिक यादीचा कुंभमेळ्याला युनेस्कोमध्ये स्पर्धा होती. मात्र, युनेस्कोच्या अधिसभेत भारताने सादर केलेला कुंभमेळ्याचा प्रस्ताव हा सर्वांगाने उजवा ठरला. त्यामुळे चीनवर कुंभमेळा प्रस्ताव मात देणारा ठरला.

कुंभमेळ्याचा प्राथमिक प्रस्ताव नाशिकहून सादर झाल्यानंतर केंद्र सरकारने कुंभमेळ्यांशी संबंधित साधू-महंत, आखाडा परिषद, उज्जैन, हरिद्वार, अलाहाबादसह नाशिकमधील  कुंभमेळा संयोजनात सहभागी धार्मिक, स्वयंसेवी संस्था, व्यक्ती व कार्यकर्त्यांशी पत्रव्यवहार करून युनेस्कोच्या भारतातील प्रतिनिधी उषा राय यांच्याकडे प्रस्ताव सुपूर्द केला होता. दोन वर्षांपासून युनेस्कोच्या अधिसभेत विविध देशांच्या प्रतिनिधींकडून कुंभमेळ्याला जागतिक वारशात समाविष्ट करण्यासाठी विविधांगी चर्चा सुरू होती. त्यातच वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी चीनची स्पर्धा निर्माण झाली होती.

 मात्र, कुंभमेळ्याचे भारतात होणारे आयोजन, त्याद्वारे एकत्र येणारे देशा-विदेशातील विविध जाती-धर्मांची माणसे, पर्यटक, अभ्यासक, कुंभमेळ्याचे नियोजन, त्याची शास्त्रीय, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणे या बाबींचा ऊहापोह युनेस्कोच्या अधिसभेने केला. त्यानंतर कुंभमेळ्याचा जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्याचा निर्णय युनेस्कोने घेतला होता. युनेस्कोच्या पॅरिस येथील कार्यालयाने या निर्णयाची गुरुवारी सकाळी अधिकृत घोषणा केली. युनेस्कोने ही माहिती केंद्र सरकारला कळविल्यानंतर केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांनी ट्विट करून ही माहिती दिली. नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन या सन्मानाची माहिती दिली व देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन कुंभमेळ्याची युनेस्कोच्या सांस्कृतिक यादीत समाविष्ठ झाल्याचे सांगताना म्हटले की, नाशिकच नव्हे तर देशासाठी ही गौरवास्पद बाब आहे. तर त्र्यंबकेश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्त ललिता शिंदे यांनी कुंभमेळा जागतिक वारसा यादीत समाविष्ठ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती पत्रकार परिषदेत दिली.