Tue, Apr 23, 2019 02:02होमपेज › Nashik › इंदिरा गांधी रुग्णालयास क्लीन चिट

इंदिरा गांधी रुग्णालयास क्लीन चिट

Published On: Dec 22 2017 1:28AM | Last Updated: Dec 21 2017 11:25PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी 

अर्भक मृत्यू प्रकरणात आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या असलेल्या इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांची महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने 24 तासांच्या आत चौकशी करून या प्रकरणी रुग्णालयास क्लीन चिट दिली आहे. वैद्यकीय विभागाने गुरुवारी (दि.21) हा अहवाल अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना सादर केला आहे. हा सर्व प्रकार बघता वैद्यकीय विभाग या प्रकरणातील दोषी डॉक्टरांना पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मंगळवारी (दि.19) दुपारी इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला योग्य उपचार न मिळाल्याने अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या अर्भकाच्या नातेवाइकांनी मृत अर्भक थेट अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलावर ठेवत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली होती. या प्रकारामुळे महापालिकेच्या रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश आयुक्त अभिषेक कृष्णा व महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी (दि.20) वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेंद्र भंडारी यांना दिले होते. चौकशी समितीत वैद्यकीय अधीक्षकांसह स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ यांचा समावेश करण्यात आला होता. चौकशी समितीच्या अहवालातून वास्तव समोर येऊन दोषींवर कारवाई होईल, ही अपेक्षा होती. मात्र, इतर कामात चालढकल करणार्‍या वैद्यकीय विभागाने 24 तासांच्या आत चौकशी पूर्ण करून अर्भक मृत प्रकरणी इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीन चिट दिली आहे. प्राथमिक चौकशीचा हा अहवाल अतिरिक्त आयुक्त बोर्डे यांना सादर करण्यात आला. अहवालात एक प्रकारे डॉक्टरांना निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याने अर्भकाच्या मृत्यूस जबाबदार कोण, हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. वैद्यकीय विभागाने अर्भक मृत्यू प्रकरणी स्वत:ची जबाबदारी झटकली असल्याचे बोलले जात आहे.