Sat, Apr 20, 2019 09:56होमपेज › Nashik › मनपाच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे उद्या उद्घाटन

मनपाच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे उद्या उद्घाटन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


नाशिक : प्रतिनिधी

मनपाच्या कचरा डेपोवरील महत्त्वाकांक्षी अशा वेस्ट टू एनर्जी (वीजनिर्मिती प्रकल्प) या प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी (दि.29) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होत आहे. या प्रकल्प अंतर्गत 30 मे. टन कचर्‍यांवर प्रक्रिया करून बायोगॅस व मिथेन गॅस तयार करून त्याद्वारे वीजनिर्मिती केली जाणार आहे. 

जर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत जर्मन व भारत सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून शहरामध्ये कचर्‍यापासून वीजनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पासाठी जीआयझेड जर्मनी यांच्याकडून तांत्रिक व आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. प्रकल्पात दररोज सुमारे 15 ते 20 मे. टन ओला कचरा व 10 ते 15 मे. टन सार्वजनिक शौचालयातील मलजलावर प्रक्रिया करून बायोगॅस व मिथेन गॅस तयार करून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी आठ कोटी दोन लाख इतका खर्च येणार आहे. त्यापैकी जी.आय.झेड. जर्मनी यांच्याकडून नाशिक महापालिकेस सहा कोटी 80 लाख इतके अनुदान व उर्वरित खर्च सुमारे एक कोटी 22 लाख प्रकल्प उभारणी करणारी कंपनी करीत आहे. 10 वर्ष कालावधीसाठी प्रकल्प चालविण्यास दिला जाणार आहे. तसेच, प्रकल्पासाठी लागणारा ओला कचरा व मलजल वाहतुकीची जबाबदारी कंपनीची राहील. या बदल्यात मनपा कंपनीस सुमारे चार लाख 95 हजार दरमहा देणार आहे.