होमपेज › Nashik › गीतेला मातृरूपात पाहिल्यास सहज आकलन

गीतेला मातृरूपात पाहिल्यास सहज आकलन

Published On: Dec 22 2017 1:28AM | Last Updated: Dec 21 2017 11:23PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

गीता समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाचा अभ्यासक असण्याची आवश्यकता नाही. गीतेला मातृरूपात पाहू शकणार्‍या कोणालाही गीतेचे सहज आकलन होऊ शकते. गीतेवर आधारित वक्तृत्व स्पर्धेला युवकांचा लाभलेला प्रतिसाद व त्यांना गीतेत निर्माण झालेला रस आशादायी आहे, असे प्रतिपादन स्वाध्याय परिवाराच्या अध्वर्यू धनश्रीदीदी तळवलकर यांनी केले.

पांडुरंगशास्त्री आठवले प्रवर्तीत स्वाध्याय परिवाराच्या वतीने गीताजयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीप्रसंगी त्या विराट जनसमुदायाला उद्देशून बोलत होत्या. त्र्यंबक रोड येथील ठक्कर मैदानात गुरुवारी सायंकाळी हा भव्य कार्यक्रम झाला. यावेळी धनश्रीदीदी म्हणाल्या, नुसत्या वाचन-लेखनाच्या माध्यमापेक्षा माणसाने थेट माणसापर्यंत पोहोचण्यासाठी स्वाध्याय परिवाराने सुरू केलेल्या प्रयत्नांना युवावर्गाची मिळणारी साथ महत्त्वाची आहे. अन्य सारे युवकांबाबत नैराश्यपूर्ण उद्गार काढत असताना, पांडुरंगशास्त्री आठवले मात्र युवकांविषयी अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन बाळगून होते. युवकही त्यांच्या अपेक्षांना खरे उतरले. त्याचा प्रत्यय या स्पर्धेच्या निमित्तानेही आला. युवावर्गाला गीतेविषयी प्रेम निर्माण व्हावे, यासाठी त्यांनी या स्पर्धा सुरू केल्या. गीता हा जुनाट ग्रंथ असल्याचा अनेकांचा समज असतो; मात्र तो बदलण्यासाठी या स्पर्धा महत्त्वाच्या ठरत आहेत. गीतेला समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची नव्हे, तर तिच्याकडे अर्जुनाच्या दृष्टिकोनातून व प्रेमपूर्वक पाहण्याची गरज आहे. 

स्वाध्याय परिवारातर्फे सुमारे 41 वर्षांपासून आयोजित केल्या जाणार्‍या या स्पर्धेला विश्‍वव्यापक स्वरूप देण्यात आले असून, यंदा देशातील 18 राज्ये व इंग्लंड, अमेरिकेसह अनेक देशांत 18 भाषांत झालेल्या या स्पर्धेत तब्बल साडेचार लाख युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी ‘गीता : तेजाचे दर्शन, मानवमूल्य संवर्धन’ असा विषय देण्यात आला होता. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतून 3% हजार 110 युवक-युवती स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धा युवा केंद्रापासून ते गट, तालुका, जिल्हा या टप्प्यांत घेण्यात आल्या. नाशिक विभागाची अंतिम फेरी गुरुवारी झाली. यावेळी 12 विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कार्यक्रमानंतर हजारो युवकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.