Wed, Jul 17, 2019 18:14होमपेज › Nashik › विघ्नहर्त्याची आज प्रतिष्ठापना

विघ्नहर्त्याची आज प्रतिष्ठापना

Published On: Sep 13 2018 1:46AM | Last Updated: Sep 13 2018 12:29AMनाशिक : प्रतिनिधी

आबालवृद्धांच्या लाडक्या श्री गणरायाचे गुरुवारी (दि.13) ढोल-ताशांच्या गजरात आगमन होणार असून, घरोघरी व सार्वजनिकरीत्या ‘श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना केली जाणार आहे. गणरायाच्या आगमनासाठी नाशिककर सज्ज झाले असून, बुधवारी (दि. 12) दिवसभर त्याची जय्यत तयारी सुरू होती. श्री प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. 

हिंदू धर्मात श्री गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेशमूर्तीची घरोघरी व सार्वजनिकरीत्या प्रतिष्ठापना केली जाते, तर अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप दिला जातो. यंदाच्या वर्षी अकरा दिवसांचा गणेशोत्सव आला असून, त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (दि. 12) शहरात सर्वत्र लगबग सुरू होती.

मुहूर्त असा...

श्री गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी गुरुवारी (दि.13) सूर्योदयापासून ते दुपारी 1.30 पर्यंतचा मुहूर्त आहे. गुरुवार दुपारी 2.52 पर्यंत भद्रा नक्षत्र असले, तरी श्री गणेश स्थापनेसाठी भद्रा दोष मानू नये. श्री गणेश प्रतिष्ठापनेसाठी दुपारपर्यंत मुहूर्त असला, तरी सूर्योदय ते सकाळी 9 पर्यंतची वेळ सर्वोत्तम असल्याचे शास्त्र अभ्यासक मोहन दाते यांनी सांगितले.