Sat, Mar 23, 2019 01:56होमपेज › Nashik › मिसळ सरमिसळ!पेच-प्रसंग 

मिसळ सरमिसळ!पेच-प्रसंग 

Published On: Jan 21 2018 2:51AM | Last Updated: Jan 21 2018 1:03AMसुधीर कावळे

लोकसभा आणि विधानसभेची मुदत संपण्यास अजून वर्ष-दीड वर्षाचा कालावधी शिल्लक असला तरी खर्चात बचत करण्याच्या इराद्याने या दोन्ही निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीची आतापासूनच तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. जनतेच्या प्रश्‍नांबाबत अचानक उमाळा दाटून येण्याबरोबरच पक्षातून गेलेल्या मंडळींना गोंजारण्याचे कामदेखील सुरू झाले आहेे.

नेतून गेलेल्या मावळ्यांनाही ‘या चिमण्यांनो परत फिरा’ असे म्हणत त्यांना मिसळ पावची मेजवानी दिली जात आहे. सेेनेच्या या मिसळीच्या तर्रीचा ‘ठसका’ बसलेल्या इतर पक्षांच्या मंडळींनीही याला तोडीस तोड उत्तर देण्याचा इरादा स्पष्ट करीत राष्ट्रवादीनेही भरीत पार्टीचे आयोजन केले आहे. तर विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर राष्ट्रवादीनेही नुकताच जंगी मोर्चा काढत पक्षाची धुगधुगी कायम असल्याचे दाखवून देण्याचा खटाटोप केला. संपूर्ण राज्यभरात ट्रॅकवरून घसरलेले मनसेचे इंजीनही पुन्हा एकदा इंधनसाठा जमवून ट्रॅकवर येण्यासाठी धडपडत आहे. त्यासाठी त्यांनी नाशिक जिल्ह्यात बोगस मतदारांविषयीच्या तक्रारीचा बॉम्बगोळा टाकला. सर्वच राजकीय पक्षांची ही धडपड आगामी निवडणुकीसाठीच सुरू आहे, हे न कळण्याइतपत जनता खुळी नक्कीच नाही.

‘अ‍ॅण्टी इन्कम्बन्सी’चा फटका बसू नये म्हणून भाजपा डिसेंबरअखेरीसच निवडणुका घेण्याच्या मूडमध्ये आहे. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करावयाचा झाल्यास शहर आणि जिल्ह्यात सध्या सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळेच राजकीय पक्षांची नेतेमंडळी खडबडून जागी झाली असून, त्यासाठी जोर बैठका काढण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांचा 25 वर्षांचा ‘याराना’ मागील निवडणुकीत तुटला. त्यातही चार वर्षांत या दोन्ही पक्षांमधील संबंध इतके पराकोटीचेे ताणले गेले आहेत की, पुन्हा युती होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळेच दोन्ही पक्षांमधील इच्छुक ‘एकला चलो रे’ म्हणत तयारीला लागले आहेत. मिसळ पार्टीद्वारे नेते आणि कार्यकर्ते यांना एकत्र आणण्याचा पहिला प्रयोग सेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला. त्यानंतर सुनील बागूल, आ. योगेश घोलप, विलास शिंदे यांनीही त्याचे अनुकरण केले. पूर्वी निवडणुकीच्या काळात राबणार्‍या कार्यकर्त्यांसाठी मटण आणि दारूच्या पार्ट्या देण्याची सोय निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराकडून केली जात असे. (आताही केली जाते) पण, आता निवडणुकीपूर्वीच  कार्यकर्त्यांना खूश करण्याचे काम सुरू झाले आहे. मिसळ म्हणजे नाशिकची एक वेगळी ओळख. त्यामुळे खाद्य संस्कृतीचीही जोपासना यातून होत आहे. मिसळ पार्टीच्या निमित्ताने पक्षातील जुने नवे कार्यकर्ते एकत्र करून त्यातून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न असला तरी प्रत्यक्ष निवडणुकीत कशी सरमिसळ होते यावर सारे काही अवलंबून आहे. शिवसेनेने मिसळ पार्टीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम सुरू केले आहे. त्याला आगामी निवडणुकीच्या गणितांची किनार आहे. नाशिकरोड -देवळाली मतदारसंघ हा सेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, सध्या फॉर्मात असलेल्या भाजपाकडून यावेळी तोडीस तोड उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यातही महापालिका निवडणुकीमध्ये बबन घोलप यांच्या दोन्ही कन्यांना ‘होमपीच’वरच पराभवाचा धक्का सहन करावा लागला. महापालिका निवडणुकीमध्ये तोंड पोळलेल्या घोलपांनी आता ताकही फुंकून पिण्यासाठी पोरजे मळ्यामध्ये मिसळ पार्टी आयोजित करून विधानसभेची पेरणी करण्याचा प्रयत्न केला. मागील निवडणुकीनंतर पक्षापासून दुरावलेल्या मंडळींबरोबरच पक्षातीलच अंतर्गत विरोधकांनाही आपलेसे करण्यासाठी मिसळ पार्टीला आमंत्रित करून सोयीचे राजकारण या पार्टीच्या माध्यमातून केले. नाशिकरोड-देवळाली मतदारसंघ हा सेनेचा बालेकिल्ला जरी समजला जात असला तरी या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्याचा डाव भाजपाकडून आखला जात आहे. त्यामुळेच घोलप  आतापासून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांवर रस्त्यावर उतरण्यामागील कारणही तेच आहे. शिंदे गाव टोलनाक्यावर परिसरातील 20 किलोमीटरच्या गावांतील नागरिकांना मोफत पास देण्यासाठीही त्यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्‍न धसास लावण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेमध्ये मिसळ पार्टीचे पेव फुटले असताना राष्ट्रवादीचे नाशिकरोडमधीलच लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या एका उमेदवारानेही प्रजासत्ताकदिनी भरीत पार्टीचे आवतण कार्यकर्त्यांना दिले आहे. लोकसभा निवडणुकीचा आजवरचा इतिहास पाहता खासदार ‘रिपीट’ होत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबरच भाजपाकडूनही माणिकराव कोकाटे, सुनील बागूल, आ. अपूर्व हिरे यांची तयारी सुरू आहे. त्यातही अपूर्व हिरे यांनी कालिका माता मंदिरात श्रीफळ वाढवत भाजपाबरोबर किंवा भाजपाशिवाय अशा दोन्ही शक्यता गृहीत धरून निवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे.

राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ तुरुंगात गेल्यामुळे एक प्रकारची मरगळ आली आहे. पक्षीय पातळीवरील जे संघटन हवे त्याचा पायाच भुसभुशीत झाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीबरोबरच नाशिक महापालिका निवडणुकीमध्येही या पक्षाची खस्ता हालत झाली होती. मध्यंतरीच्या काळात पक्षामध्ये जान फुंकण्यासाठी जयंत पाटील यांची पक्षाने नाशिक प्रभारी म्हणून नियुक्ती केली. नियुक्तीनंतर त्यांनी नाशिक तसेच दिंडोरीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांच्या शिडामध्ये हवा भरण्याचे काम केले. मात्र, त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. आता पुन्हा एकदा झोपेतून जागे झाल्याप्रमाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मोर्चा काढून आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

नवनिर्माणाचे स्वप्न भंगल्यानंतर नाशिककर जनतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजीन साइडिंगला टाकले होते. यार्डात उभे असलेले हेे इंजीन पुन्हा एकदा ट्रॅकवर येण्याच्या प्रयत्नात आहे. नाशिक पूर्वमधून विधानसभेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून पक्षाने नुकतेच शहरप्रमुखपदावर अनिल मटाले यांची निवड केली. ही निवड एकीकडे केली नाही तोच राहुल ढिकले यांनी नाशिक पूर्वमध्ये सव्वा लाख मतदार बोगस असल्याचा बॉम्ब टाकला. केवळ नाशिक पूर्वमध्येच नाही तर जिल्ह्यातही बर्‍याच ठिकाणी अनेक मतदारांची नावे दुबार असल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत आपण सातत्याने पाठपुरावा करीत असूनही निवडणूक आयोग दाद देत नसल्याचा त्यांचा दावा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गेल्या पाच वर्षांच्या काळात मोठीच पडझड झाली आहे. पक्षातील अनेक जण इतर पक्षांत जाऊन स्थिरावले आहेत. कार्यकर्ते तर शोधून सापडणेही अवघड आहे. अशा परिस्थितीत विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी ढिकले यांनी मोठ्या तडफेने सुरुवात केली आहे. तथापि, केवळ आरोपांची राळ उडवून भागणार नाही तर त्यासाठी त्यांना कठोर मशागतदेखील करावी लागणार आहे.

एकीकडे सर्वच राजकीय पक्ष मिसळ, भरीत पार्टी, मोर्चे यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीला लागले असताना काँग्रेसमध्ये मात्र सन्नाटा दिसून येतो. पक्षाचे स्वत:चे म्हणून काही अस्तित्वही शहरात दिसून येत नाही. काँग्रेस कमिटीमध्ये केवळ जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यापुरते किंवा मोजकी डोकी जमवून एखादे आंदोलन करण्यापुरतेच या पक्षाचे काम दिसूून येत आहे. जिल्ह्यात तर काँग्रेसचे नेमके कार्य सुरू आहे की नाही, हा संशोधनाचा विषय ठरावा. गुजरात निवडणुकीमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी मिळाल्यामुळे काँग्रेसचे हौसले इतर ठिकाणी बुलंद होताना दिसत असताना नाशिकमध्ये मात्र, हा पक्ष अजूनही मागील पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडलेला दिसून येत नाही. केंद्रात आणि राज्यात सध्या भाजपाची सत्ता असल्याने या पक्षामध्ये नाशिकमध्ये ‘इनकमिंग’चे प्रमाणही मोठे आहे. त्यातूनच एकमेकांमध्येच मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात महापालिकेच्या सत्ताधार्‍यांमध्ये झालेल्या कुरबुरी हा त्याचाच परिपाक होता. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपामध्ये मोठी स्पर्धा निर्माण होण्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. त्यामुळेच अपूर्व हिरे यांनी निवडणुकीची तयारी सुरू करतानाच नेमकी कोणती निवडणूक लढविणार याचे पत्ते उघड केलेले नाहीत. तर भाजपाचे तिकीट न मिळाल्यास पूर्वाश्रमीच्या पक्षात जाऊन निवडणूक लढविण्याचे मनसुबेही काही मंडळींचे आहेत. मात्र, सध्या ते ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. एकूणच गेल्या काही दिवसांपासून ‘एकमेकांच्या गळ्यात गळे घालण्याचे जे काही मिसळ पर्व’ सुरू झाले आहे आणि त्याचा आस्वाद भलेही कार्यकर्ते घेत असले तरी या पार्टीच्या आडून आगामी निवडणुकीची तयारी सुरू असल्याचीच खात्री पटते. आता या मिसळ पावची सरमिसळ प्रत्यक्षात कशी होते ते पाहायचे!