नाशिक : प्रतिनिधी
निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात बीएलओंकडून कामे करून घेण्यात हलगर्जीपणा केलेल्या पाच तहसीलदारांना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे.
आगामी 2019 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी मतदार याद्या शुद्धीकरणाचे काम निवडणूक आयोगाने हाती घेतले होते. त्यानुसार जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघात 4 हजार 928 बीएलओंची नेमणूक करण्यात आली होती. या बीएलओंनी घरोघरी जाऊन भेटी देणे अपेक्षित होते. यात नवमतदार नोंदणी, नागरिकांच्या पत्यात व नावात दुरूस्ती करणे, मयत मतदारांची नावे यादीतून वगळणे आदी प्रकारची कामे करायची होती. परंतु, नाशिक पश्चिम, मालेगाव मध्य, येवला, निफाड तसेच सिन्नर तालुक्यात अपेक्षेप्रमाणे बीएलओंनी काम केले नसल्याचे उघड झाले आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात तीन लाख 69 हजार 273 मतदार असताना 1428 मतदारांपर्यंत बीएलओ पोहोचले. येवल्यातील 2 लाख 80 हजार 988 पैकी 2117 मतरांच्या बीएलओंनी भेटी घेतल्या. निफाड, सिन्नर व मालेगाव मध्यची परिस्थिती वेगळी नसल्याचे आढळून आले आहे.
बीएलओंकडून काम करून घेण्याची जबाबदारी तहसीलदारांची असताना या पाचही तालुक्यांमध्ये मतदार यादी पुनरीक्षणाचे काम सर्वात कमी झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी संबंधित तहसीलदारांना नोटिसा काढल्या असून, खुलासा मागवला आहे. हा खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर जिल्हाधिकारी पुढील कारवाईचा निर्णय घेऊ शकतात.