Thu, Apr 25, 2019 07:29होमपेज › Nashik › डस्टबिन खरेदी केले, पण कोड क्रमांकच दिले नाहीत

डस्टबिन खरेदी केले, पण कोड क्रमांकच दिले नाहीत

Published On: Jan 05 2018 1:17AM | Last Updated: Jan 04 2018 11:44PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

तब्बल 21 लाख रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेल्या 189 डस्टबीनचे कोड नंबरच स्वच्छता निरीक्षकांना ठाऊक नसल्याने त्यातील कचरा उचलण्यात अडचणी निर्माण झाल्याची कबुली खुद्द स्वच्छ निरीक्षकांनीच दिली आहे. यामुळे शहरासह परिसरातील बहुतांश सर्वच डस्टबिन कचर्‍याने ‘ओव्हर फ्लो’ झाले आहेत. 

पश्‍चिम प्रभाग समितीची सभा सभापती डॉ. हेमलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेत डस्टबिनविषयीचे चित्र उघड झाले. गेल्या एक महिन्यापासून मनपात डस्टबीन खरेदीचे प्रकरण गाजत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत महापौर भानसी यांनी तर या खरेदीचा अहवाल सादर करण्याचे आदेशही आरोग्य विभागाला दिले आहेत. 11 हजार 121 रुपयांना खरेदी केलेल्या या प्रत्येक डस्टबिनला साखळी आणि कुलूप लावण्यात आले आहे. यामुळे त्यातील कचरा उचलण्यास अनेक अडचणी येत असल्याने अनेक डस्टबिन ‘ओव्हर फ्लो’ झाले आहेत. याबाबत सभापती डॉ. पाटील यांनी डस्टबिनबाबत स्वच्छता निरीक्षकांकडे माहिती विचारली. त्यावर डस्टबीनला साखळीने कुलूप लावलेले असल्याने त्यातील कचरा स्वच्छ करता येत नसल्याचे सांगितले. तसेच, कुलूपाचे कोड क्रमांक आम्हाला दिलेले नसल्याने ही अडचण निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे आरोग्य विभागाने केवळ 21 लाखांची खरेदी केली. परंतु, त्याबाबतची दक्षताच घेतलेली नसल्याची बाब यानिमित्ताने समोर आली आहे. एकूणच आरोग्य विभागाने केलेली ही खरेदी स्वच्छता निरीक्षकांनाच रुचलेली नाही.

अस्वच्छता करणार्‍यांची नावे देऊनही कारवाई का केली जात नाही, असा प्रश्‍न स्वाती भामरे यांनी स्वच्छता निरीक्षकास केला असता विभागीय स्वच्छता निरीक्षक शिरसाठ यांनी माझे कार्यक्षेत्र बदलल्याने कारवाई केली नाही, असे उत्तर एका स्वच्छता निरीक्षकाने दिले. यामुळे विभागीय स्वच्छता निरीक्षक परस्पर नियुक्त्या देत असल्याचेही समोर आले. मायको सर्कल ते मुंबई नाका तसेच प्रभाग क्रमांक 13, 12 व 7 मध्ये अनेक ठिकाणी पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नगरसेवक समीर कांबळे, योगेश हिरे व हिमगौरी आडके यांनी केली. जुने नाशिक भागातील स्वच्छतागृहांची अजूनही रंगरंगोटी व दुरूस्ती झालेली नसल्याची तक्रार वत्सला खैरे यांनी केली. त्यावर येत्या सोमवारपर्यंत (दि.8) सर्व स्वच्छतागृहे, रस्ते दुभाजक व साईडपट्ट्यांची कामे केली जाणार असल्याचे उपअभियंता सचिन जाधव यांनी सांगितले.