Wed, Apr 24, 2019 01:30होमपेज › Nashik › पैशांचा पाऊस पाडणार्‍या मांत्रिकाचा पर्दाफाश

पैशांचा पाऊस पाडणार्‍या मांत्रिकाचा पर्दाफाश

Published On: May 25 2018 11:35PM | Last Updated: May 25 2018 11:22PMनाशिक/पंचवटी : प्रतिनिधी 

अघोरी कृत्य करून एक कोटी रुपयांचा पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगणार्‍या दोन मांत्रिकांसह पाच जणांना आडगाव पोलिसांनी औरंगाबाद रोड येथून गुरुवारी (दि.24) मध्यरात्री रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सहा संशयितांवर आडगाव पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यांंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनेे परिसरात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार महिला (रा. नालासोपारा वेस्ट, जि. पालघर) यांनी लोकांकडून 10 लाख रुपये घेतले होते. आठ दिवसांपूर्वी फोनद्वारे नाशिक येथील त्यांच्या परिचयाचे प्रमोद बापू सूर्यवंशी (रा. जागृतीनगर, नाशिकरोड) यांना फोन करून आर्थिक अडचण सांगितली. तेव्हा प्रमोद याने त्यांच्या ओळखीचे मांत्रिक असून, ते मंत्राच्या शक्तीच्या साह्याने पैशांचा पाऊस पाडतात, असे सांगितले. त्यासाठी     कुमारी मुलगी देवी म्हणून बसवावी लागेल, असे सांगत मांत्रिक व त्याच्या सहकार्‍यांना 60 हजार रुपये दिल्यास ते एक करोड रुपयांचा पाऊस पाडतील, अशी माहिती प्रमोद याने फोनवर दिली. पैशाची गरज असल्याने प्रमोद याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून तक्रारदार महिला एका मुलीसह गुरुवारी (दि.24) नाशिकमध्ये आल्या. त्यांनी रात्री 11 वाजता प्रमोदची भेट घेत या कामासाठी लागणारे 30 हजार रुपये दिले. उर्वरित पैसे नंतर देते, असे सांगितले. त्यानंतर प्रमोद याने औरंगाबाद रोड येथील देव मोटर्स येथे सुधीर भोसले, चंद्रकांत जेजूरकर (आप्पा), तुषार चौधरी, संदीप वाकडे (मांत्रिक) व निखिल (मांत्रिक) यांची ओळख करून दिली. त्यानंतर मांत्रिकांनी पूजेसाठी लागणारे साहित्य, लिंबू, तांब्या, हळद, कुंकू, आंब्याची पाने, तांदूळ, एक अंडे, हिरवा कपडा, पांढरी साडी, पांढर्‍या बांगड्या, पैंजण, कानातील रिंग, नेलपेंट, नारळ, पेढे, अत्तर, विड्या, बिंदी, अगरबत्ती आदी साहित्य आणले. रात्री 11 च्या सुमारास देव मोटर्स येथील कार्यालयात नेत तेथे संदीप वाकडे व निखिल या मांत्रिकांच्या सांगण्यावरून इतरांनी पूजा मांडून मंत्र उच्चारण्यास सुुरुवात केली. याच वेळी आडगाव पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकत अघोरी कृत्य करताना मांत्रिकासह सहा जणांना रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी पाच जणांना केली अटक 

तक्रारदार महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध जादूटोणा कायद्याअंतर्गत अघोरी कृत्य करून पैशाचा पाऊस पाडणे व फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद बापू सूर्यवंशी (36, रा. प्लॉट. नं. 16, जागृतीनगर 2, सायट्रिक कंपनी रोड, जेलरोड), सुधीर दत्तू भोसले (34, रा. रोकडोबावाडी, रोकडोबा मंदिर शेजारी, देवळाली गाव), तुषार नरेंद्र चौधरी (40, रा. एन. 41/एएफ 2/25/8/ साईबाबानगर, सिडको), संदीप सीताराम वाकडे (35, रा. भुजबळ फार्म, सप्तशृंगी चौक, सिडको) व चंद्रकांत राघोजी जेजूरकर (48, रा. घर. न.4394, पाथरवट लेन, शिवाजी चौक, पंचवटी) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या संशयितांनी यापूर्वी कुणाकडून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून गंडा घातला असल्यास अशा नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी केले आहे.