होमपेज › Nashik › भिडे गुरुजी हाजिर हो!

भिडे गुरुजी हाजिर हो!

Published On: Aug 10 2018 6:46PM | Last Updated: Aug 11 2018 1:21AMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक येथे आयोजित एका सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी यांना 31 ऑगस्ट रोजी नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने हजर होण्याचे आदेश बजावले आहेत. नाशिक महापालिकेने या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात भिडे गुरुजी यांच्याविरोधात खटला दाखल केल्यानंतर त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची नाशिकमध्ये 10 जून रोजी सभा झाली होती. त्या सभेमध्ये भिडे गुरुजी यांनी माझ्या बागेतील आंबे खाल्ल्यानंतर मुलगा होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या बाबत ‘लेक लाडकी अभियानतर्फे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकाकडे तक्रार करण्यात आली होती.

त्या तक्रारीची दखल घेत, नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाला त्यांच्या वक्तव्याची दखल घेत शहानिशा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यात प्रथमदर्शनी भिडे दोषी आढळून आल्याने त्यांना आरोग्य विभागाने नोटीस बजावली होती. मात्र, भिडे यांच्याकडून नोटिसेला कोणतेही उत्तर आले नव्हते. त्यामुळे महापालिकेने जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यासंदर्भात जिल्हा न्यायालयात सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.10) पुन्हा सुनावणी झाली. यावेळी महापालिकेतर्फे अ‍ॅड. सुवर्णा शेफाल यांनी युक्तिवाद केला असता, तो ऐकून घेतल्यानंतर न्या. जयदीप पांडे यांनी संभाजी भिडे यांना 31 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

भिडे उपस्थित राहणार का याकडे लक्ष

चौकशी समितीने केलेल्या तपासणीत भिडे हे प्रथमदर्शनी दोषी असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे त्यांना यासंदर्भात नोटीस बजावून चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र, भिडे गुरुजींकडून नोटीस स्वीकारण्यात आली नाही.