Wed, Jul 17, 2019 12:00होमपेज › Nashik › वेटरशी झालेल्‍या वादातून त्‍याने झाडली गोळी

वेटरशी झालेल्‍या वादातून त्‍याने झाडली गोळी

Published On: Jan 21 2018 5:30PM | Last Updated: Jan 21 2018 5:30PMधुळे : प्रतिनिधी

धुळे शहरातील मालेगाव रोडवरील एका हॉटेलमधे वेटरबरोबर झालेल्‍या वादावादीत एकाने गाळीबार केल्‍याची घटना घडली. सुदैवाने दुपारी हॉटेलमधे गर्दी नसल्याने कोणतीही प्राणहानी झाली नाही.  या गोळीबाराच्या प्रकारामुळे धुळयात अवैध पिस्तुलांच्या तस्करीचा धंदा सुरू असल्‍याचे समोर आले आहे.

धुळे शहराकडुन मालेगाव शहराकडे जाणार्‍या मार्गावर रेल्वे क्रॉसिंगजवळ हॉटेल सम्राट आहे. या हॉटेलमधे मांसाहारी जेवणासाठी नेहमी मोठी गर्दी होते. आज दुपारी देखिल या हॉटेलमधे तुरळक गर्दी होती. मात्र दुपारी दोन वाजेनंतर शेडमधे दोन टेबलवर ग्राहक जेवण करीत होते. यावेळी दोन तरूण खाली असलेल्या टेबलवर जेवणासाठी बसले. त्यांच्याकडे शेख अब्बास हा वेटर पाणी घेवुन गेला. यावेळी एका तरूणाने या वेटरला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने वेटर आणि या दोघांमधे हुज्जत सुरू झाली. यावेळी हॉटेलचे चालक अस्लम मन्सुरी यांनी या दोघा तरूणांची समजूत घातली. मात्र यातील एकाने ही माहिती फोनवरून अन्य युवकाला सांगीतल्यानंतर काही वेळातच तो संशयीत युवक हॉटेल बाहेर आला. त्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यानंतर राग अनावर झालेल्या या युवकाने गावठी पिस्तुल काढुन हॉटेलच्या शेडमधे काऊंटरच्या दिशेने एक गोळी झाडली. परिणामी हॉटेलमधे धावपळ सुरू झाली. शेडमधील ग्राहकांनी देखिल पलायन केले. हा सर्व धिंगाणा दहा ते पंधरा मिनिटे सुरू होता. दरम्यान हॉटेल चालकांनी ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांना कळविली. यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. यापथकाने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर संबंधीत युवकाला ओळखले असुन, त्याला धुळे तालुक्यातील चितोड गावातुन ताब्यात घेण्यात आले आहे. या युवकाला चाळीसगाव रोड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरीत दोघा पोलिसांकडून तरूणांचा शोध सुरू आहे.