Mon, Apr 22, 2019 06:31होमपेज › Nashik › ट्रक-बस अपघातात देवळ्याजवळ चार ठार

ट्रक-बस अपघातात देवळ्याजवळ चार ठार

Published On: Sep 04 2018 1:59PM | Last Updated: Sep 04 2018 10:43PM
देवळा : वार्ताहर
शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या भावडबारी घाटाच्या पायथ्याशी मंगळवारी (दि.4) दुपारी साडेबारा वाजता नंदुरबार आगाराची बस व ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील चार प्रवासी जागीच ठार झाले. तर इतर जखमी बारा प्रवाशांपैकी नऊ गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, यात बसचा पूर्णतः चक्‍काचूर झाला असून, बसच्या उजव्या बाजूचा भाग पूर्णतः कापला गेला आहे. याबाबत माहिती अशी की, नंदुरबार-नाशिक ही बस (एमएच-20-बीएल-2310) भावडबारी घाटाच्या पायथ्याशी ट्रकला ओव्हरटेक करीत असताना समोरून वेगात आलेल्या ट्रकने (टी.एन.-52-जे-1055) बसला धडक दिली. यात बसचालकाचा भाग सोडून पूर्ण बाजू कापली गेली. त्यामुळे या बाजूला बसलेल्या प्रवाशांना सर्वाधिक फटका बसला. ही दोन्ही वाहने वेगामुळे काही अंतर फरफटत गेल्याने त्याचा झटका मागून येणार्‍या ट्रकला बसल्याने त्याच्यातील क्लीनर जखमी झाला. मृतांमध्ये राहुल राजाराम देवरे (23, रा. शरदनगर, सटाणा), दीपक सदाशिव कुलकर्णी (45, रा. चित्तळवेढे, ता. अकोले), कांचनबाई नरेश जैन (45, रा. वर्धाने, ता. साक्री) व सुनंदा भटू महिरे (40, रा. छडवेल, ता. साक्री) यांचा समावेश आहे. तर बसमधील 19 प्रवाशांपैकी नऊ जण गंभीर जखमी झाले. याचदरम्यान चांदवड-देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर देवळ्याकडे येत असल्याने त्यांनी स्वतः मदतकार्यात सहभाग घेऊन तातडीने रुग्णवाहिका बोलावली.जखमींमध्ये सरला शिवले (25, सावकी, ता. देवळा), मीराबाई आहेर (60, देवळा), संदीप बर्वे (37), कमल बर्वे (40, जेलरोड, नाशिक), नीलेशकुमार वळवी (20, गुलंबा, नंदुरबार), भटू महिरे (50, छाडवेल, साक्री), युनुस पठाण (50, देवळा), राशीद पठाण (40, बसचालक, निजामपूर), फयाज पठाण (7), अझरूद्दीन पिंजारी (31, बसवाहक, नंदुरबार), योगेश खैरनार (24, रा. ठेंगोडा), गोकुळ देवरे (28, मालेगाव).