Thu, Apr 25, 2019 11:29होमपेज › Nashik › निवड होऊनही फौजदार प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत

निवड होऊनही फौजदार प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत

Published On: Dec 06 2017 1:42AM | Last Updated: Dec 05 2017 11:54PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

राज्य शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2016 मध्ये घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत राज्यभरातील 828 उमेदवारांची निवड करण्यात आली. यापैकी काही उमेदवार नाशिक जिल्ह्यातील आहेत. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकादमीत शासनाकडून पाठवले जात नसल्याने शिफारसपात्र उमेदवारांचे फौजदाराचा गणवेश अंगावर चढविण्याचे स्वप्न अधांतरी आहे. 

पोलीस विभागातील खातेंंतर्गत 21 जून 2016 रोजी राज्य शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 35/2016 क्रमांकाच्या जाहिरातीमार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी उमेदवारांची 21 ऑगस्ट 2016 ला लेखी परीक्षा घेण्यात आली तसेच 21 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 पर्यंत शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्यानंतर या परीक्षेचा अंतिम निकाल 5 मे 2017 मध्ये लागला. त्यात राज्यभरातून 828 उमेदवारांची निवड करण्यात आली असून, त्यातील नाशिक शहरामधील 18, ग्रामीणमधील 18 आणि महाराष्ट्र पोलीस अकादमीतील दोन पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. अंतिम गुणवत्ता यादीनुसार पोलीस महासंचालकांकडून 10 ऑगस्टला पात्र उमेदवारांना नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे पोलीस उपनिरीक्षकपदाच्या प्रशिक्षणासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेऊन ती कागदपत्रे महाराष्ट्र पोलीस अकादमीत पाठविण्यात आली.

दरम्यान, या परीक्षेत निवड न झालेल्या काही उमेदवारांनी मॅटसह उच्च न्यायालयात याचिका दाखल करून गुणवत्ता यादीवर हरकत घेतली. दरम्यान, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली, तसेच न्यायालयाने निवड झालेल्या 828 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू करण्याचे आदेश दिले. पात्र उमेदवारांना 13 नोव्हेंबरला प्रशिक्षणास महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे हजर राहण्याचे आदेश  पोलीस महासंचालकांनी दिले. मात्र, गृहविभागाकडून कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले जात नसल्याने प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत पात्र उमेदवार आहेत.