Thu, Jun 27, 2019 13:54होमपेज › Nashik › पीक कर्जमाफीचे ५० कोटी जिल्हा बँकेला प्राप्त

पीक कर्जमाफीचे ५० कोटी जिल्हा बँकेला प्राप्त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

सरकारने जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दुसर्‍या टप्प्यात 50 कोटी रुपये प्राप्त झाले असून, नऊ हजार शेतकर्‍यांच्या कर्जखात्यावर ही रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ शासकीय सूत्रांनी दिली. दरम्यानच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणारी जिल्हा बँक ऊर्जितावस्थेत येण्यास सुरुवात झाली आहे.

पहिल्या ग्रीन यादीत नाशिक जिल्ह्यातील 879 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले होते. पहिल्या हप्त्यासाठी जिल्हा बँकेला तीन कोटी 70 लाख रुपये प्राप्त झाले होते. पण, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी बरेच दिवस गेल्याने ही रक्कम प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या कर्जखात्यावर जमा होण्यास गेल्या आठवड्यात सुरुवात झाली आणि काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण झाली. आता दुसर्‍या टप्प्यात बँकेला आधी 33 कोटी आणि त्यानंतर 17 कोटी रुपये असे एकूण 50 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. 

साधारणत: नऊ हजार शेतकर्‍यांच्या कर्जखात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. यासाठी बँकेचे अधिकारी-कर्मचारी कामाला लागले आहेत. थकीत कर्ज, नोटाबंदी या निर्णयांमुळे आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या जिल्हा बँकेला कर्जमाफीचे पैसे मिळू लागल्याने तिजोरीत भर पडत आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी पैसा उपलब्ध होऊ लागला असून, बँकेचा रूतलेला आर्थिक गाडा पूर्वपदावर येऊ लागला आहे. दरम्यान, दुसरी ग्रीन यादी नेमकी कधी जाहीर होणार याकडे डोळे लावून बसलेल्या शेतकर्‍यांचीही प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.