होमपेज › Nashik › डस्टबिनवरून मनपा आयुक्त आरोग्य अधिकार्‍यांवर तापले 

डस्टबिनवरून मनपा आयुक्त आरोग्य अधिकार्‍यांवर तापले 

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 14 2017 10:59PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

वादग्रस्त डस्टबिन खरेदीसंदर्भात आयुक्तांनी डस्टबिनचा दर्जा आणि किंमत याबाबतचा अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडून मागविला आहे. दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षणानंतर डस्टबिन मनपा शाळांना देण्यात येणार असल्याचे वक्तव्य केल्याच्या कारणावरून आयुक्तांनी आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांची कानउघडणी करत बेजबाबदारपणाचे वक्तव्य यापुढे करू नका, असा सज्जड दम भरला. 

आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या डस्टबिनचा मुद्दा आता आणखी वादग्रस्त ठरू लागला आहे. गुरुवारी (दि.14) शिवसेनेने अधिकार्‍यांना डस्टबिनची भेट देत आंदोलन केले. कचराकुंडीमुक्त शहर असताना पुन्हा डस्टबिन खरेदी करण्याचे कारण काय असा प्रश्‍न आंदोलकांनी उपस्थित केला असता त्यावर स्वच्छ सर्वेक्षण झाल्यानंतर डस्टबिन मनपा शाळांना दिले जाणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी सांगितले. हाच मुद्दा पकडून आंदोलनकर्त्यांनी मनपा अधिकारी जनतेच्या पैशांची लूट करून शासनाची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. डस्टबिन शहरभर बसवून पुन्हा काढायचेच होते तर खर्च करण्याची गरज काय असा प्रश्‍नही उपस्थित करण्यात आला. ही माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मिळताच त्यांनी आरोग्य अधिकार्‍यास दूरध्वनी करून वादग्रस्त विधान करण्याची काय गरज होती. मुद्दा मांडता येत नसेल तर बेजबाबदारपणाचे विधान तरी कशाला करता असे सांगत डॉ. बुकाणे यांना धारेवर धरले. दरम्यान, डस्टबिन खरेदीसंदर्भात कृष्णा यांनी माहिती मागविली असून, डस्टबिनची किंमत व दर्जा याबाबत अहवाल अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडून मागविला आहे.