Mon, May 20, 2019 08:15होमपेज › Nashik › चांदवडजवळ आठ ठार

चांदवडजवळ आठ ठार

Published On: Jun 23 2018 12:32PM | Last Updated: Jun 23 2018 1:24PMचांदवड : वार्ताहर

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यात खडकजांबजवळ क्रुझर जीप व बस यांच्यात शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार तर नऊ गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिला, अकरा वर्षांची चिमुकली तसेच जीपचालकाचा समावेश आहे. जखमींना चांदवड, पिंपळगाव बसवंत, नाशिक येथील रूग्णालयात उपचारासाठी  हलविण्यात आले आहे. या अपघातानंतर बसच्या पाठीमागे असलेल्या इर्टिगा व इनोव्हा या दोन्ही कार बसवर जाऊन आदळल्या. अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली.

बागलाण  तालुक्यातील किकवारी खुर्द येथील कैलास महादू जगताप यांच्या मुलीचा  शनिवारी (दि.23) दुपारी विवाह असल्याने घरातील मंडळी तसेच नातेवाईक क्रुझर जीपने (एमएच 15, ईबी 3619) नाशिककडे जात होते.  खडकजांब गावच्या शिवारात  जीपचे टायर फुटल्याने गाडी  दुभाजक ओलांडून सटाणा आगाराच्या  नाशिककडून नंदुरबारला जाणार्‍या बसला (क्र. एमएच 14, बीटी 4716) जाऊन धडकली. हा अपघात झाल्यावर बसच्या पाठीमागून येणारी इर्टिगा (एमएच 19, बीजे 7020) व तिच्या मागे असलेली इनोव्हा (एमएच 01, एएल 8233) बसला जाऊन धडकली. या भीषण अपघातात  जीपचा पूर्ण चक्काचूर होऊन जीपचालकासह पाच अशा एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 11 जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वडाळीभोई येथील पोलीस हवालदार कल्याणराव जाधव यानीं घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना बाहेर काढून उपचारासाठी पिंपळगाव बसवंत येथे हलविले. जखमींवर धन्वंतरी व राधाकिसन या दोन खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले.

अपघातातील मोहिनी विनायक मोरे (50, मुंजवाड), मुलगी सिद्धी विनायक मोरे (11) व शोभा संतोष पगारे (40, रा. मुंजवाड) या तिघींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच अकरावर्षीय सिद्धी मोरे व शोभा पगारे या दोघींचा मृत्यू झाला. तर मोहिनी मोरे यांना नाशिक येथे हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

यावेळी चांदवडचे प्रांत सिद्धार्थ भंडारे, वडनेर भैरवचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पिंपळगावचे सहायक पोलीस बिपीन शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक अरुण पाटील, अभिजित जाधव हे घटनास्थळी उपस्थित होते. मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अपघातामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांची मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्तांच्या नातेवाइकांनी पिंपळगाव बसवंत येथे पोहचून एकच आक्रोश केल्याने संपूर्ण परिसर हळहळला होता.