Tue, May 21, 2019 22:38होमपेज › Nashik › मनपाच्या अंदाजपत्रकात दोनशे कोटींची तूट पडणार

मनपाच्या अंदाजपत्रकात दोनशे कोटींची तूट पडणार

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 07 2017 11:33PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

मनपाच्या लेखा व वित्त विभागाने सुधारित अंदाजपत्रकाचे काम हाती घेतले आहे. गेल्या आठ महिन्यात झालेल्या जमा-खर्चाचा ताळमेळ बसविताना लेखा अधिकार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत असून, उत्पन्नापेक्षा खर्चाची बाजूच अधिक वाढल्याने खर्चाचा ताळमेळ कसा बसवावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येत्या चार महिन्यात उत्पन्न आणि खर्च यात सुमारे दोनशे कोटींची तफावत पडणार असल्याने अनेक विकासकामांना ब्रेक द्यावा लागणार आहे. त्यामुळेच 257 कोटींची कामे पुढे ढकलण्यात आल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

सध्याची मनपाची आर्थिक स्थिती पाहिल्यास मनपाला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगरसेवक निधी आणि 257 कोटींच्या रस्त्यांच्या कामांनी तर मनपाचे कंबरडेच मोडले आहे. त्यात केंद्र व राज्य शासनाच्या स्मार्ट सिटी, मुकणे पाणीपुरवठा योजना, घरकुल योजना यासह विविध योजनांचा हिस्साही मनपाला पेलवताना नाकीनव आले आहेत. उत्तरदायित्वाचा डोंगर तर सुमारे 815 कोटींपर्यंत पोहोचला आहे. त्यातील 257 कोटी रुपये तर रस्त्यांच्या कामांसाठी आहेत. परंतु, उत्पन्न पाहता ही कामे पुढील आर्थिक वर्षातच घेतली जाणार आहेत. या सर्व बाबी पाहता लेखा विभागाने सर्व खातेप्रमुखांना पत्र पाठवून नवीन विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करू नयेत, अशा स्पष्ट स्वरूपाच्या सूचना केल्या आहेत. मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी 1410 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात स्थायी समिती आणि महासभेने वाढ करून हेच अंदाजपत्रक सुमारे 2100 कोटींपर्यंत पोहोचल्याने अंदाजपत्रकाचा आकडा मोठा झाला आहे. लेखा विभागाने सुधारित अंदाजपत्रकाचे काम हाती घेतले आहे. गेल्या आठ महिन्यांत उत्पन्नाची बाजू आणि खर्चाचा आढावा घेतला जात आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत मनपाच्या अनुदान व विविध योजनेच्या उत्पन्नातून तिजोरीत सुमारे 900 कोटी रुपये जमा झाले. तर खर्च 825 कोटींपर्यंत गेला आहे.