Mon, Jun 24, 2019 21:28होमपेज › Nashik › भाजपा नगरसेवकांनी मनपाकडे फिरवली पाठ

भाजपा नगरसेवकांनी मनपाकडे फिरवली पाठ

Published On: Sep 02 2018 1:15AM | Last Updated: Sep 02 2018 12:35AMनाशिक : प्रतिनिधी

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्‍वास ठराव बारगळल्याने नाराज झालेल्या भाजपाच्या नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांनी शनिवारी (दि.1) महापालिकेकडे पाठ फिरविली. केवळ स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके आणि सभागृहनेते दिनकर पाटील यांनी हजेरी लावत आपले कामकाज केले. 

1 सप्टेंबर रोजी करवाढीच्या मुद्यावरून आयुक्‍त मुंढे यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल करण्यासाठी विशेष महासभा बोलाविण्यात आली होती. परंतु, यासंदर्भात पक्षश्रेष्ठींनाच या अविश्‍वास ठरावाविषयी माहिती नसल्याने विशेष महासभेच्या आदल्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर रंजना भानसी यांना दूरध्वनी करून अविश्‍वास ठराव मागे घेण्याचे आदेश दिले. यामुळे महापौरांनी आदेश शिरसावंद्य मानून ठरावच नव्हे, तर विशेष महासभाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शनिवारची (दि.1) सभा होऊ शकली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या वागणुकीमुळे भाजपासह विरोधी पक्षांचे नगरसेवकदेखील वैतागले आहेत. याबाबत अनेकदा पक्षश्रेष्ठींकडे गार्‍हाणे मांडूनही त्यात सुधारणा न झाल्याने अविश्‍वास ठरावाचा निर्णय घेण्यात आला. परंतु, तोही पक्षाकडून बारगळल्याने भाजपाच्या नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. संबंधित नगरसेवक उघडउघड बोलत नसले तरी पक्षासह आमचीही प्रशासनाने लाज काढली, अशी प्रतिक्रिया व्यक्‍त करत आहेत. याच कारणामुळे अनेकांनी तर मनपाची पायरीच चढायची नाही, अशी    खूणगाठ बांधली आहे. शनिवारी (दि.1) सभापती आडके आणि सभागृह नेते पाटील वगळता भाजपाच्या एकाही पदाधिकार्‍याने हजेरी लावली नाही.

अविश्‍वास ठराव बारगळल्यानंतर आता प्रत्येक जण स्वत:ची बाजू सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वरिष्ठांशी संपर्क साधून एकमेकांचे नाव पुढे केले जात आहे. शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांनी तर दूरध्वनीच बंद करून ठेवला आहे. अविश्‍वासाच्या या नाट्यानंतर मनपातील विविधप्रश्‍नी आता वरिष्ठ काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून आहे. कारण 65 नगरसेवक पदाधिकारी आणि वरिष्ठांनाही नाराज करून चालणार नाही. कारण येत्या विधानसभा निवडणुकांतील जागा याच नगरसेवकांच्या बळावर भाजपाला जिंकाव्या लागणार आहेत. 

अनेकांच्या भूमिका अस्पष्ट

भाजपा पदाधिकार्‍यांनी आपल्या करवाढीबाबत तसेच इतरही बाबींविषयी आपल्या भूमिका स्पष्ट न केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. सभापती हिमगौरी आडके यांनी अविश्‍वास ठरावाच्या पत्रावर दोन्ही वेळा स्वाक्षरी केलेली नाही. तर सभागृह नेते दिनकर पाटील यांनी सभा रद्द करण्यासाठी स्थायी सदस्यांनी केलेल्या पत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार देत अविश्‍वास ठरावावर तसेच करवाढ रद्द करण्याबाबत आपले मत कायम ठेवले. 

बदलीची अजूनही चर्चा 

तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्‍वास मागे घेतला गेला असला तरी त्यांच्या डोक्यावरील बदलीची तलवार मात्र कायम असल्याचे बोलले जात आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेली चर्चा अजूनही थांबली नाही. यामुळे आता शासनाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते किंवा करवाढ पूर्णत: मागे घेऊन महासभेने मंजुर केलेली 18 टक्के करवाढच लागू केली जाते की काय, याकडे लक्ष लागून आहे.