Sun, Mar 24, 2019 12:26होमपेज › Nashik › भीमा-कोरेगाव घटनेचे जिल्ह्यात पडसाद

भीमा-कोरेगाव घटनेचे जिल्ह्यात पडसाद

Published On: Jan 03 2018 1:15AM | Last Updated: Jan 02 2018 11:34PM

बुकमार्क करा
नाशिक : टीम पुढारी

भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद मंगळवारी नाशिक जिल्ह्यातही उमटले. शहरातील पंचवटी, नाशिकरोड, जेलरोड, सिडको, सातपूर आदी परिसरात काही अज्ञात समाजकंटकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली. यात सहा बसेसचे नुकसान झाले तर, काही ठिकाणी खासगी वाहनांच्याही काचा फोडण्यात आल्या. पोलीसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली. नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता शांतता राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दोन वाहनांची सातपूरला तोडफोड

सातपूर : वार्ताहर

  भीमा- कोरेगाव घटनेच्या पार्श्‍वभूूमीवर निषेध व्यक्त करण्यासाठी आयटीआय पुलावर  अज्ञात समाजकंटकांनी दोन  वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान एका खासगी शाळेची बस (एमएच 15 इपी 0938)   अल्टो  कार (एमएच 15 डीएस  3749)  या दोन वाहनांवर  दगडफेक करण्यात आल्याने काच फुटून नुकसान झाले. सातपूर पोलिसांत अज्ञात समाजकंटकाविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला.

सातपूर परिसरातील  काही नागरिकांनी  नालंदा बुद्ध विहार, श्रमिकनगर  ते सातपूर पोलीस स्टेशन असा पायी निषेध मोर्चा काढत  निषेध नोंदविण्यात आला. श्रमिकनगर, अशोकनगर, सावरकरनगर,आनंद छाया, सातपूर कॉलनी,सातपूर गाव असा  शांततेत मोर्चा काढत असे कृत्य करणार्‍यांना त्वरित अटक करण्याच्या मागणीचे निवेदन उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांना दिले.  उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त सचिन गोरे, पोलीस निरीक्षक राजेश आखाड़े, मधुकर कड,  शीघ्र कृती दल कर्मचारी  यावेळी उपस्थित होते. अनुचित प्रकार होऊ नये यासाठी  सातपूर परिसरात चोख  बंदोबस्त   ठेवण्यात आला.

सातपूर : भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सातपूर येथे  नालंदा बुद्ध विहार, श्रमिकनगर ते सातपूर पोलीस ठाणे असा पायी काढलेला निषेध मोर्चा.