Thu, Mar 21, 2019 23:20
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › एटीएसने  मागविली भाडेकरूंची माहिती

एटीएसने  मागविली भाडेकरूंची माहिती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

दहशतवादी विरोधी कक्षाने शहरातील मिळकतधारकांनी ठेवलेल्या भाडेकरूंची माहिती  मनपाच्या मूल्य निर्धारण व विविध कर विभागाकडे मागविली आहे. यासंदर्भात मनपाला पत्र प्राप्त आहे. गोपनीय कामासाठी संबंधित माहिती हवी असल्याचे त्यात म्हटले आहे. 

सहा-सात वर्षांपूर्वी सातपूर विभागातील एका वस्तीत राहणार्‍या बिलाल नामक दहशवाद्यास दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली होती. विशेष म्हणजे संबंधित दहशतवादी हा या ठिकाणी अनेक दिवसांपासून राहत होता. असे असताना त्याबाबतची कोणतीही माहिती पोलीस वा शेजारी राहणार्‍या रहिवाशांना देखील नव्हती. घरमालकाने भाडेकरूविषयी माहिती दिली नव्हती. याच कारणामुळे पोलीस यंत्रणेने शहरातील सर्वच मिळकतधारकांनी त्यांच्याकडील भाडेकरूची नोंद त्या-त्या भागातील पोलीस ठाण्यात करणे अनिवार्य केले होते. परंतु, त्यानंतरही अनेक मिळकतधारकांनी पोलीस ठाण्यात भाडेकरूंची नोंद केलीच नाही. भाडेकरू ठेवल्यास मनपाकडून वेगळ्या कराची आकारणी केली जाते. त्यापासून वाचण्यासाठीच मिळकतधारक माहिती दडवून ठेवतात. तसेच, पोलीस खात्याच्या ससेमिर्‍याला तोंड द्यावे लागू नये हेदेखील एक कारण सांगितले जाते. पोलीस खात्याने आवाहन करूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने आता दहशतवादी विरोधी कक्षाने मनपाकडेच भाडेकरूंची माहिती मागविली आहे. सिडको, मध्य व नाशिकरोड विभागीय कार्यालयाकडून विविध कर विभागाला भाडेकरूंची माहिती सादर करण्यात आली असून, अद्याप पूर्व, सातपूर व पंचवटी विभागातील भाडेकरूंचा अहवाल प्राप्त झालेला नाही. यासंदर्भात मनपाच्या विविध कर विभागाने संबंधित विभागीय अधिकार्‍यांना पत्र पाठवून माहिती मागविली आहे.