होमपेज › Nashik › नाशिकमधील मलवाहिकांचेही  महापालिका करणार ऑडिट

नाशिकमधील मलवाहिकांचेही  महापालिका करणार ऑडिट

Published On: Feb 03 2018 2:16AM | Last Updated: Feb 03 2018 1:01AMनाशिक : वार्ताहर

मालमत्ता सर्वेक्षण आणि वॉटर ऑडिटच्या धर्तीवर शहरातील सर्वच मलवाहिकांचे ऑडिट करण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिकेने तयार करून निधी मागण्यासाठी शासनाकडे सादर केला आहे.
शहरातील पाणीपुरवठ्याबरोबरच सांडपाणी आणि मलयुक्‍त पाणी वाहून नेणार्‍या वाहिका जुन्या झाल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी गळती होऊन अनेकदा प्रदूषणासारख्या बाबींना सामोरे जावे लागते. बर्‍याचदा पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळले जात असल्याने दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी होत असतात. पाणी पुरवठ्यासंदर्भात मनपाने सल्लागार संस्थेची नेमणूक करून वॉटर ऑडिट करून घेतले आहे. त्याचा अहवाल पाणीपुरवठा विभागाला प्राप्‍त झाला असून, त्यात सुचविलेल्या उपाययोजनेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. 

खर्चाची तरतूद शासनाने उपलब्ध करून द्या

वॉटर ऑडिटप्रमाणेच सिवरेज ऑडिटही केले जाणार असून, अनेक ठिकाणच्या मलवाहिका 20 ते 25 वर्षे जुन्या झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भविष्यात सर्व मलवाहिकांचे जाळे निर्माण करून ते थेट मलजल शुद्धीकरण केंद्रांना जोडले जाणार आहेत. त्यासाठी सिवरेज ऑडिट करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून, तो अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. त्यासाठी येणार्‍या खर्चाची तरतूद शासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही महापालिका प्रशासनाने केली आहे.