होमपेज › Nashik › विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला मिळेल चालना!

विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला मिळेल चालना!

Published On: Dec 16 2017 1:46AM | Last Updated: Dec 15 2017 11:46PM

बुकमार्क करा

 नाशिक : प्रतिनिधी

नाशिकचे विमान अखेर 23 डिसेंबरला उड्डाण घेणार आहे. एअर डेक्कनच्या 19 सीटर विमानाच्या फेर्‍या आणि प्रवासी भाडे निश्‍चित झाले आहे. विमानासाठी तिकीट बुकिंग सुरू झाली आहे. विमानसेवेमुळे नाशिकच्या औद्योगिक, पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, अशी अपेक्षा उद्योजक, व्यापारी व व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. 

गेल्या काही वर्षांपासून नाशिकच्या विमानसेवेबाबत केवळ घोषणाच सुरू होत्या. परंतु, त्यासाठी कोणत्याच विमान कंपन्या  तयार नव्हत्या. विमान उड्डाणाचे स्लॉटही ठरत नव्हते. त्यामुळे आजवर सर्वच घोषणा केवळ हवेतच घिरट्या घेत होत्या. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार छगन भुजबळ यांनी विमानतळ तयार करण्यासाठी मोठा पाठपुरावा केला. विमानतळही उभे राहिले; मात्र विमानसेवा काही नाशिककरांच्या पदरी पडली नाही. खासदार हेमंत गोडसे यांनी हवाई उड्डाण मंत्रालयासमोर विमानसेवेसाठी आंदोलन केले. याची दखल घेत केंद्र शासनाने ‘उडान’ योजनेअंतर्गत नाशिकचा समावेश करून सेवा पुरविण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला. पहिल्या काही प्रवाशांना केवळ 1 रुपया दरात शुभारंभाच्या निमित्ताने प्रवास करायला मिळणार आहे. 19 आसनांपैकी नऊ आसने ही सवलतीच्या तिकिटांची असून, उर्वरित सीटांसाठी एअर डेक्कन प्रवास भाडे ठरविणार आहे. मात्र, हे भाडे 1600 ते 1700 पेक्षा जास्त नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहेत.   सध्या नाशिक ते मुंबई हे अंतर कापण्यासाठी चारचाकी वाहनाने तीन ते साडेतीन तास, तर नाशिक पुणे अंतरासाठी पाच ते सहा तास लागतात. विमान सेवेमुळे हेच अंतर केवळ 50 मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे नाशिककरांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे.