Wed, Jan 16, 2019 13:27होमपेज › Nashik › सीटबेल्ट, हेल्मेट न वापरणार्‍या ४१ हजार चालकांवर कारवाई

सीटबेल्ट, हेल्मेट न वापरणार्‍या ४१ हजार चालकांवर कारवाई

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 12 2017 11:56PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनचालकांना हेल्मेट आणि सीटबेल्टची सक्ती करण्यात आली आहे तरीदेखील शहरातील बहुसंख्य वाहनचालक सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करत नसल्याचे शहर वाहतूक शाखेच्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. चालू वर्षात 1 जानेवारी ते 11 डिसेंबर या कालावधीत 40 हजार 853 वाहनचालकांवर कारवाई करून एक कोटी 45 लाख 600 रुपयांचा तडजोड शुल्क वसूल करण्यात आला आहे. 

शहरात चालू वर्षात 161 अपघातांमध्ये चालकांसह इतर व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे तर 300 गंभीर अपघातही झाले आहेत. अपघातांसह मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी शहर पोलिसांनी वाहतूक नियमांचे पालन करण्यास वाहनचालकांना आवाहन केले आहे. त्यात मुख्यत्वे सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करण्यास सांगितले आहे तरीदेखील वाहन चालक वाहतूक नियमांचे पालन करीत नसल्याने अपघातांची समस्या ‘जैसे थे’ आहे. शहर वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार चालू वर्षात 11 डिसेंबरपर्यंत हेल्मेटचा वापर न करणार्‍या 21 हजार 100 दुचाकीस्वारांवर कारवाई करून एक कोटी पाच लाख 50 हजार रुपये तडजोड शुल्क वसूल केला. तर सीट बेल्ट वापरत नसलेल्या 19 हजार 753 कारचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून तीन कोटी 95 लाख 600 रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.