Tue, Mar 26, 2019 19:54होमपेज › Nashik › खराब टायरनेच घेतला आठ जणांचा बळी!

खराब टायरनेच घेतला आठ जणांचा बळी!

Published On: Jun 25 2018 1:50AM | Last Updated: Jun 24 2018 11:55PMसटाणा : वार्ताहर

शिरवाडे वणी येथील भीषण अपघातात निरपराध महिला आणि कोवळ्या मुलींचा बळी गेल्याने तालुकाभरात हळहळ व्यक्त होत आहे. खास बाब म्हणजे टायर खराब असतानाही मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविल्यामुळे अपघात झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनांबाबतचा मालक, चालकांचा निष्काळजीपणा आणि अशा प्रवासी वाहनांतील असुरक्षित प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

प्रवासी वाहनांमध्ये सगळ्यात जास्त मागणी असलेल्या क्रूझरच्या अपघातामुळे संपूर्ण बागलाण तालुका हादरून गेला असून, सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. संबंधित अपघातातील क्रूझरचे पुढील चाकाचे टायर खराब असल्याचे दिसून आले आहे.अतिशय घासलेला टायर फुटल्यामुळेच हा भीषण अपघात झाल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे अपघातात चालकाचाही बळी गेला असला तरी पोलिसांनी त्याच्यासह वाहनमालकाविरोधात गुन्ह्याचीदेखील नोंद केली आहे. केवळ टायर खराब झालेले असताना ते वेळीच न बदलता त्याचा वापर करण्याच्या एका चुकीमुळे मात्र आठ जणांचे जीव गमवावे लागल्याने याबाबत गंभीरतेने चर्चा होताना दिसून आली.अलीकडे सगळ्यांचेच जीवनमान सुधारले असून, लग्नकार्य असो किंवा अंत्यविधी, एकाच वेळी अधिक लोकांना बाहेरगावी जायचे असल्यास क्रूझरलाच पसंती दिली जाते. दुसर्‍या वाहनांच्या तुलनेत क्रूझरमध्ये जास्तीत जास्त लोक बसू शकतात.त्यामुळे त्याचे भाडे परवडणारे असल्यामुळे बहुतेकांकडून क्रूझरची निवड केली जाते. क्रूझरला नऊ अधिक एक अशी अधिकृत प्रवासी बसण्याची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र तब्बल 15 ते 17 लोक बसून प्रवास करतात. एखाद्या खासगी कार्यक्रमासाठी दहापेक्षा अधिक लोकांना जायचे ठरल्यास क्रूझर ठरवून घेतल्यास एसटीपेक्षा कमी भाडे लागते. एका दिवसाच्या प्रवासासाठी अडीच तीन हजार रुपये देऊन क्रूझर उपलब्ध होत असल्याने बहुतांश प्रवासीवर्गाकडून क्रूझरला सर्वाधिक पसंती असते. त्यामुळे एकट्या सटाणा शहरात पन्नासपेक्षा अधिक क्रूझर असून, तालुक्यातील आकडा किमान पाचशेच्या घरात असल्याचे सांगितले जाते.खास बाब म्हणजे याच क्रूझरने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आणि चारीधामपासून भारत दर्शनपर्यंतचे भाडे केले जाते. त्यातही अलीकडे लग्नाच्या वर्‍हाडासाठी मोठी वाहने अप्रतिष्ठा मानली जाऊ लागली असून, लग्नासाठी एकाच वेळी तब्बल दहापासून पंचवीसपर्यंत क्रूझर लावल्याची उदाहरणे दिसून येत आहेत. अशाच एका वर्‍हाडाला झालेला अपघात मात्र एकाच वेळी आठ, पंधरा कुटुंबे उघड्यावर पाडून गेला आहे.