Fri, Feb 22, 2019 23:58होमपेज › Nashik › जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीचा आराखडा तयार

जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीचा आराखडा तयार

Published On: Jan 21 2018 2:51AM | Last Updated: Jan 21 2018 1:07AMनाशिक : प्रतिनिधी 

536 दुचाकी अन् 101 चारचाकी पार्किंगसाठी सुसज्ज जागा ...पाच लिफ्ट आणि चार जिन्यांचा समावेश असलेली सहा मजली जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत उभी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, तो बांधकाम सभापती मनीषा रत्नाकर पवार यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांना सादर केला आहे. आता हा आराखडा सरकारला सादर करून निधीची मागणी केली जाणार आहे. 48 कोटी 51 लाख रुपये खर्च होणार आहे. फेब्रुवारीत या आराखड्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील कुक्कुट पालन केंद्राच्या जागेवर ही  इमारत उभी के ली जाणार आहे. त्यासाठी पवार यांनी वास्तुविशारद सुशांत पाटील यांच्याकडून आराखडा तयार करून घेतला आहे. 18,341 चौरस मीटर जागेवर बांधण्यात येणार्‍या इमारतीत एकूण सहा मजले असतील. तळघर मजल्यावर 101 चारचाकी पार्किंग होतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तळमजल्यावर 536 दुचाकींसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. पहिला मजल्यावर महिला व बालकल्याण, सामान्य प्रशासन, समाजकल्याण या विभागांची कार्यालये व याच विभागांच्या सभापतींची दालने असणार आहे. दुसर्‍या मजल्यावर अर्थ, लघुपाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पशुसंवर्धन व कृषी विभागांची कार्यालये  आणि त्यांच्या सभापतींची दालने असतील. तिसर्‍या मजल्यावर अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दालने तसेच सभागृह असेल. सर्वच पक्षांच्या गटनेत्यांचे कक्ष आणि पत्रकार कक्षही याच मजल्यावर राहणार आहे. नाशिकरोडला असलेले मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यालयदेखील याच मजल्यावर असेल. चौथ्या मजल्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपाध्यक्ष, सदस्यांसाठी प्रतीक्षालय, विशेष समिती सभागृह, व्ही.सी. हॉल, सर्व शिक्षा अभियान, भूजल सर्वेक्षण व ऑडिटर कक्ष असेल. पाचव्या मजल्यावर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, आरोग्य विभागांची कार्यालये आणि त्यांच्या सभापतींची दालने राहणार आहेत. सहाव्या मजल्यावर बांधकामचे तिन्ही विभाग आणि त्यांच्या सभापतींची दालने तसेच उपहारगृह राहणार आहे.