Sun, Jul 21, 2019 16:36
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › विधान परिषद निकाल: 'दराडेंचे वक्तव्य भुजबळांना बदनाम करण्यासाठी'

विधान परिषद निकाल: नरेंद्र दराडेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया!

Published On: May 24 2018 4:38PM | Last Updated: May 24 2018 5:00PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक स्थानिक प्राधिकारी संस्थेसाठी असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी ‘माझा विजय छगन भुजबळ यांच्या पाठिंब्यामुळे झाला आहे’ असे वक्तव्य केले. दराडे यांनी केलेले हे वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित आहे. छगन भुजबळ आजारी असतांना त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवून त्यांच्या आजारपणाच्या काळात राजकीय भांडवल करणे हे दुर्दैवी असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जयवंतराव जाधव यांनी व्यक्‍त केले आहे.

वाचा: भुजबळांमुळे मी आमदार; सेनेच्या विजयी उमेदवाराचा गौप्यस्फोट

आमदार जयवंतराव जाधव यांनी म्हटले आहे की, पक्षाशी गद्दारी करणे हे भुजबळांच्या रक्तात नाही. भुजबळ हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असून ते लिलावती रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत आहेत. यामुळे त्यांची शिवसेनाच काय तर सर्व पक्षातील अनेक मान्यवर नेते त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटत आहेत. बिहारचे माजी राज्यपाल डॉ.डी.वाय.पाटील तसेच  शिवसेनेतील मंत्री विजय शिवतारे, दादा भुसे यांच्यासह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि भारतीय जनता पक्षाचेही अनेक आमदार नेते त्यांना भेटून गेले. मात्र शिवसेना पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर भेटायला आले म्हणजे विधानपरिषद निवडणुकीशी या भेटीचा संदर्भ जोडणे हे चुकीचे आहे. नार्वेकर हे केवळ भुजबळ साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. मात्र केवळ भुजबळांबाबत गैरसमज पसरवण्यासाठी दराडेंनी हे विधान केले आहे.

वाचा : विधान परिषद निकाल : भाजप- सेनेला प्रत्येकी दोन जागा, राष्ट्रवादी एक, अन् काँग्रेसचा भोपळा!

भुजबळांवर दोन दिवसांपूर्वीच अॅन्जीओग्राफी करण्यात आली आहे. कालच त्यांच्यावर शस्त्रक्रियासुद्धा  करण्यात आलेली असून, त्यांच्यावर लिलावती हॉस्पीटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष असून, ते पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. कार्यकर्त्यांना पक्षाविरोधात काम करण्याचा त्यांनी कधीच सल्ला दिलेला नाही. खरंतर राष्ट्रवादीचे केवळ १०० मते असतांना २३२ मतांपर्यंत राष्ट्रवादीने मजल मारली आहे. केवळ भुजबळ यांच्या अनुपस्थितीचा शिवसेनेला फायदा झाला असून, ते पूर्ण वेळ नाशिकमध्ये असते तर कदाचित निकाल वेगळा लागू शकला असता. मात्र वैद्यकीय उपचार घेत असलेल्या छगन भुजबळ यांच्याबद्दल गैरसमज पसरविणे हे राजकीय हेतून प्रेरित असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

वाचा : काँग्रेसचा पचका! शंभरहून अधिक मतं भाजपला