Mon, Sep 24, 2018 09:59होमपेज › Nashik › नाशिकमधील विजय माझ्यासाठी महत्त्वाचा 

नाशिकमधील विजय माझ्यासाठी महत्त्वाचा 

Published On: May 25 2018 11:35PM | Last Updated: May 25 2018 11:31PMनाशिक : प्रतिनिधी

स्वबळाच्या निर्णयानंतर नाशिकमधून मिळालेला पहिलाच विजय माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नाशिककरांनी विजयाचा खाऊ घातलेला पेढा मी विसरणार नाही, अशा शब्दात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र दराडे यांच्या विजयाबद्दल नाशिकच्या पदाधिकार्‍यांचे कौतुक केले. 

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे विजयी झाले. शिवसेना विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि भाजपा असे चार पक्ष एकत्र येऊनही शिवसेनेने विजयश्री खेचून आणल्याने शिवसेनेसाठी हा विजय महत्त्वाचा ठरला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तर शिवसैनिकांना उभारी देणाराच हा विजय आहे. याच पार्श्‍वभूमीवर नरेंद्र दराडे यांच्यासह ग्रामविकासमंत्री दादा भुसे, नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सचिन मराठे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, निवृत्ती अरिंगळे, डी. जी. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. यामुळे भविष्यात हा बालेकिल्ला अधिक भरभक्कम करण्यासाठी एकजुटीने काम करा, असे आदेशही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देत दराडे यांना शुभेच्छा दिल्या.