Wed, Apr 24, 2019 19:55होमपेज › Nashik › तरुणसागरजींनी केली होती चार विश्‍वविक्रमांची नोंद

तरुणसागरजींनी केली होती चार विश्‍वविक्रमांची नोंद

Published On: Sep 02 2018 1:15AM | Last Updated: Sep 02 2018 12:18AMनाशिक : प्रतिनिधी

येथील जैन समाजाचे युवा कार्यकर्ते पारस लोहाडे यांचे मुनिश्री तरुणसागरजी यांच्याशी निकटचे संबंध होते. तरुणसागरजी नोंदविलेल्या चार विश्‍वविक्रमांच्या यशातही लोहाडे यांचा महत्त्वाचा वाटा होता. तरुणसागरजींच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहाडे यांना दूरध्वनी करून शोक व्यक्‍त केला. 

पारस लोहाडे हे सन 2004 पासून मुनिश्री तरुणसागरजी यांच्या कोअर कमिटीतील सदस्य आहेत. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात लोहाडे यांचा सहभाग होता. तरुणसागरजी यांच्या नावावर एकूण चार विश्‍वविक्रमांची नोंद आहे. त्यात लोहाडे यांची मुख्य भूमिका होती. पहिला विश्‍वविक्रम अहिंसा दांडी यात्रेचा नोंदविण्यात आला. त्यात महात्मा गांधीजींच्या वेशभूषेतील 895 मुलांची दांडी यात्रा काढण्यात आली. त्यानंतर 26 हजार 500 पुस्तके एकावर एक रचून जगातील सर्वांत  मोठे बुक पिरॅमिड बनविण्याचा विक्रम करण्यात आला. जगातील सर्वांत मोठे 25 फूट उंचीचे पुस्तक तयार करून गिनिज बुकमध्ये तिसरा विक्रम नोंदविण्यात आला. तर त्यानंतर 31 फूट उंचीचे पुस्तक तयार करीत आधीचाच विक्रम तोडण्यात आला. 

 मुनिश्री तरुणसागरजी यांनी जैन समाजात प्रथमच गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला. या कार्यक्रमाची संकल्पना व संपूर्ण आखणी लोहाडे यांचीच होती. ते सन 2005 पासून आतापर्यंत दरवर्षी 10 दिवस व्यवसाय सोडून या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बेळगाव, बंगळुरू, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, भोपाल, उदयपूर, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली, फरिदाबाद, सिकर, दिल्ली जात असत.